Maharashtra Kalyan Crime News :  रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन खेचून पळून गेलेला चोरटा चोरी केलेले दागिने सोनाराकडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोनाराच्या दुकानाबाहेर सापळा रचून या चोरट्याला अटक केली. संतोष तेलंग असं या चोरट्याचं नाव असून तो रिक्षा चालक होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडल्याने रिक्षा चालवू शकला नाही, त्यामुळे  रिक्षाचे थकलेले कर्ज व कुटुंब कसे चालवायचं? या आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करला होता. 


एक इसम चोरी केलेले दागिने कल्याण बाजारपेठ परिसरात एका सोनाराच्या दुकानात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे कर्मचारी विनोद चन्ने याना पेट्रोलिंग दरम्यान  मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राइम ब्रांच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचत दागिने विकण्यासाठी आलेल्या इसमाला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने काही दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका वृद्ध महिलेची चैन खेचून पळ काढला होता, हीच चैन विकण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली. संतोष तेलंग असं या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली चैन हस्तगत केली आहे. यानंतर या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री करून घेत पोलिसांनी संतोष तेलंग याला अटक केली आहे. 


संतोषने याआधी अशा प्रकारे चोरी केली आहे का? याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान संतोष हा रिक्षा चालक होता रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडला .आजारपणामुळे तो रिक्षा चालवू शकला नाही. त्यामुळे रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्याच्यासमोर होता. आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :