गोंदिया : क्षणिक राग काय थराला जाऊ शकतो आणि त्यातून माणूस काय टोकाचे पाऊल उचलू शकतो याचा काही नेम नाही. अशीच एक खळबळजनक घटना  गोंदियातील तिरोडा या तालुक्यातील ग्राम पाटीलटोला या गावात घडली आहे. आईने तयार केलेल्या भाजीत जरा मीठ जास्त झाले म्हणून चक्क एका तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे  परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भूषण राधेश्याम तिडके असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून या प्रकरणामागील कारण ऐकून सऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.


क्षुल्लक कारणावरून उचलले टोकाचे पाऊल 


तिरोडा तालुक्यातील ग्राम पाटीलटोला (घोगरा) (Gondia Crime News)  येथे राहणारा भूषण राधेश्याम तिडके हा नेहमीप्रमाणे  साधारणत: 8 वाजताच्या सुमारास आपल्या घरी जेवत होता. भूषणच्या आईने नेहमीप्रमाणे घरी सर्वांसाठी स्वयंपाक केला होता. मात्र त्या दिवशी भूषणच्या आईकडून भाजीमध्ये अनावधानाने मीठ जरा जास्त झाले. भूषण ज्यावेळी जेवण करत असतांना सदर बाब त्याच्या लक्ष्यात आली आणि त्याचा राग अनावर झाला. भूषणाचा राग एवढा तीव्र होता की, तो आईवर जोर जोरात ओरडू लागला. आईने त्याची समजूत काढण्याचा फार प्रयत्न केला. मात्र भूषणने आईच्या समजावण्याला फार दाद दिली नाही. त्यानंतर त्याने जेवण करण्यास देखील नकार दिला आणि समोरील ताट सरकावून तो रागाच्या भारत घरातून बाहेर पडला.


चालत्या रेल्वे पुढे उडी मारत संपवले आयुष्य 


आईशी वाद घालून रागारागातून घर सोडून बाहेर निघालेला भूषण त्या रात्री उशीरा पर्यंत घरी परतला नाही. त्यानंतर सदर प्रकार भूषणच्या आईने भूषणच्या भावांना सांगितला. त्यानंतर त्यांनी भूषणशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर त्यांनी गावात सर्वत्र भूषणाचा शोध घेतला. या उशिरापर्यंत घेतलेल्या शोधात रात्रीच्या सुमारास पाटील टोला येथील रेल्वे पुलाच्या बाजूला तुमसर ते गोंदिया जाणाऱ्या रेल्वे लाइनवर भूषणचा मृतदेह आढळून आला. भूषणने रागाच्या भरात चालत्या रेल्वेपुढे येत स्वत:चे आयुष्य संपवले असल्याचे तपासातून पुढे आले. या घटनेसंदर्भात अमर जगन्नाथ तिडके यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार शिवलाल धावडे करीत आहेत. मात्र या धक्कादायक घटनेमुळे तिडके कुटुंबियांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. 


हे ही वाचा :