बीड : बीड प्रेम विवाह झाल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यातच पत्नीला अपशकुनी म्हणून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये या घटनेने खळबळ  उडाली आहे. या प्रकरणी पती आणि सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


बीडच्या गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी गावात या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. अजय आणि प्रतीक्षाच एकमेकांवर प्रेम जडलं दोघांनीही लग्न करण्याच ठरवलं. मात्र आपल्या लग्नाला घरचे लोक विरोध करतील म्हणून दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं. दोघांच्याही कुटुंबीयांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी त्यांना समज देऊन परत बोलावलं आणि अजय अन् प्रतीक्षाचा संसार सुरू झाला. सगळं सुरळीत सुरू असताना अवघ्या अडीच महिन्यातच अप्सरा वाटणारी प्रतीक्षा अजयला आणि त्याच्या कुटुंबीयांना अपशकुनी वाटू लागली आणि त्यांनी तिला त्रास द्यायला सुरु केले. 


अजय वारंवार प्रतीक्षाला मारहाण करायचा आपल्या माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता.  त्यासाठी तिला नेहमी मानसिक आणि शारीरिक त्रास तो देऊ लागला. प्रतीक्षाचा पती अजय राजगुडे, सासरा सुरेश राजगुरू आणि सासू संगीता राजवाडे यांनी संगनमत करून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रतीक्षाने प्रतिकार केला आणि ती घराच्या बाहेर पळाली.  हा प्रकार गावातच असलेल्या तिच्या मामा आणि मामीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिची त्याच्या तावडीतून सुटका केली. 


घडलेला सर्व प्रकार प्रतीक्षाने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट गेवराई पोलीस स्टेशन गाठून प्रतीक्षाने घडलेला प्रकार पोलिसांसमोर मांडला. तिच्यावर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आता गेवराई पोलिस ठाण्यात अजय आणि तिच्या सासू-सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा पती आजय राजगुडे आणि सासरा सुरेश राजवाडे यांना अटक केल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे


सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका खाऊन सुरू झालेल्या या प्रेमकहाणीचा शेवट मात्र अतिशय विदारक झाला आहे.  त्यामुळे एखाद्या चित्रपटातल्या काल्पनिक लव स्टोरीला न भाळता प्रेम करा पण जरा जपूनच...  


संबंधित बातम्या :