बीड : काही दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेलेली पत्नी घरी आली. याचा राग मनात धरुन पती, सासरे, दीर यांनी तिच्या डोक्यात वस्तूने मारहाण करुन खून केल्याची घटना बीड जिल्ह्यातील आष्टीमधील शेरी बुद्रुक या गावी घडली. मनिषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले (वय 23 वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक इथली विवाहित महिला मनिषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले ही काही दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती. ती बुधवारी (11 मे) घरी परत आली. याच कारणावरुन घरात वादाला सुरुवात झाली. पती, सासरा, दिराने संगनमत करुन मनिषा उर्फ सोनाली वाघुलेला सायंकाळी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मुत्यू झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी मृत महिलेची बहिण अश्विनी रमेश राळेभात (रा.जामखेड जि.अहमदनगर) हिने केलेल्या तक्रारीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी पती बाबासाहेब अशोक वाघुले, सासरा अशोक नारायण वाघुले, दीर प्रकाश अशोक वाघुले याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून सासरा आणि दीर फरार आहे.
तीन तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या
पत्नीचा खून करुन पती मिरजगांव, कडा या ठिकाणी लपला होता. हा आरोपी केरुळ इथे लपून बसल्याची माहिती समजताच आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस याच्या मार्गदर्शनाखीली पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे यांनी होमगार्ड महेश जाधव, वाहन चालक पठाण याच्या मदतीने शोध घेत अवघ्या तीन तासात आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या.
आष्टी पोलीस ठाण्यात पत्नी गायब झाल्याची केली होती तक्रार
8 मे रोजी पत्नी घरातून गायब झाली होती. तिचा शोध घेऊन सापडली नसल्याने पती बाबासाहेब वाघुले यांनी 9 मे रोजी आष्टी पोलीस ठाण्यात पत्नी गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. नंतर 11 मे रोजी पत्नी स्वत:हून पत्नी घरी येताच वादाला सुरुवात झाली होती. यातून हत्येची घटना घडली.
7 वर्षापूर्वी झाला होता विवाह
जामखेड इथल्या राळेभात कुटुंबातील मनिषा उर्फ सोनाली हिचा सात वर्षापूर्वी आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक इथल्या बाबासाहेब वाघुले याच्याशी झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. सुखी संसार सुरु असताना राग अनावर न झाल्याने ही घटना घडली.