Corona Update : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाचे (Corona) संकट थैमान घालत आहे. यातच आता एक दिलासा देणारे संशोधन पुढे आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करणारी कंपनी बायोएनटेक एसई आणि वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, ज्या लोकांना कोरोनाची लस घेतल्यानंतर ओमायक्रॉनची (Omicron) लागण झाली आहे, ते कोरोना विषाणूच्या अनेक प्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. याबरोबरच अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, ओमायक्रॉनचा संसर्ग हा लसीकरण झालेल्या रूग्णांमध्ये बूस्टर डोसपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करतो.  


थोडाफार दिलासा मिळत असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याशिवाय कोरोनाचे काही नवीन प्रकार आढळत असलेल्याही बातम्याही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत आतापर्यंतच्या निष्कर्षांनी काहीसा दिलासा दिला आहे. निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की , लसीकरण झालेल्या लाखो लोकांमध्ये ज्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे, त्यांची प्रतिकारशक्ती अधिक चांगली आहे आणि त्यांना कोणत्याही गंभीर आजाराची लागण झालेली नाही.


जगभरात ओमायक्रॉनचा अजूनही थोड्याफार प्रमाणात धोका आहे. विशेषतः चीनच्या शांघायमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. याबाबात माहिती देताना ब्लूमबर्ग इंटेलिजन्सचे विश्लेषक सॅम फाझेली म्हणाले की, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या लाटा अधिक वेगाने येत आहेत. ओमायक्रॉनच्या संसर्गात वाढ होत आहे. याबरोबरच बायोएनटेक एसईने आपल्या डेटाचा हवाला देऊन सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या डोससह बूस्टर डोस लोकांसाठी अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. 


दरम्यान, कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. संपूर्ण जगभरातच कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. भारतात देखील कोरोना रूग्णांमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2202 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.