Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad News) सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी पत्नी आणि त्यानंतर शेतकऱ्याने आर्थिक विवंचन आणि नैराश्यातून आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. या हृदयद्रावक घटनेने गाव सुन्न झाले असून गावात शोककळा पसरली आहे. तर या शेतकरी दांपत्याने उचलेल्या टोकाच्या पाऊलानंतर दोन मुले आणि दोन मुली पोरकी झाली आहेत. सुरेखा संतोष दळवी ( वय 41 वर्षे) आणि संतोष किसन दळवी ( वय 45 वर्षे, दोघे रा.धावडा) असे मृत शेतकरी दांपत्याची नावं आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी सुरेखा दळवी यांनी सकाळी स्वतः च्या शेतातील गट नं. 18 मध्ये विष प्राषन केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर सोमवारी सायंकाळी सुरेखा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने दळवी कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं.
...अन् पत्नीनंतर पतीनेही संपवला आयुष्य
सुरेखा दळवी यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर दळवी कुटुंब दुःखातून सावरत नाही तर बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने संतोष यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत असल्याचे घोषित केले. दरम्यान बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष दळवी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले.
कर्जाच्या चिंतेने संपवला आयुष्य
याबाबत गावकरी आणि दळवी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबांवर बँकेचे आणि बचत गटाचे कर्ज होते. दरम्यान आपल्या तीन एकर शेतातून होणाऱ्या पिकातून कर्ज फेडण्याचे त्यांनी निश्चय केला होता. मात्र सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यात मार्च महिना जवळ आला आणि रब्बीत काढलेल्या शेती मालाला भाव मिळत नव्हते. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत पती- पत्नी होते. पण पैशांची कोणतीच सोय होत नसल्याने याच नैराश्यातून सुरेखा यांनी आत्महत्या केली होती. तर त्यानंतर संतोष यांनी देखील आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मयत सुरेखा आणि संतोष दळवी यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असे कुटुंब आहे. तर एका मुलीच लग्न झालेले आहे.