मुंबई : मालेगाव (Malegaon) येथील मर्चेंट बँकेच्या (Merchant Bank) शाखेत बेरोजगार तरुणांच्या खात्यांवरून 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हे पैसे 'व्होट जिहाद'साठी वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी तक्रार देत त्यांनी चौकशीची मागणी केली होती. यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक निकम या दोघांना अटक केली आहे. आज 125 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मालेगावात 'ईडी'चे (ED) पथक चौकशीसाठी दाखल झाले आहे. आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या आहेत.
या प्रकरणातील सिराज अहमद यांही चहा आणि कोल्ड्रिंक्स एजन्सी आहे. तक्रारदाराचा भाऊ गणेश हा त्याच्या वाहतूक करणाऱ्या वाहनातून मालाचा पुरवठा करायचा. सिराजने गणेशला सांगितले होते की, त्याला मक्याचा व्यवसाय करायचा आहे आणि त्याला शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यासाठी बँक खात्यांची गरज आहे. त्याने गणेश, तक्रारदार जयेश व इतर 10 जण (प्रतिक जाधव, पवन जाधव, मनोज मिसाळ, धनराज बच्छाव, राहुल काळे, राजेंद्र बिंड, दिवाकर घुमरे, भावेश घुमरे, ललित मोरे, दत्तात्रेय उषा) यांच्याकडून पॅनकार्ड, आधारकार्ड आणि सिमकार्ड घेतले. आणि नामको बँकेत खाते उघडण्यासाठी बँकेत नेले होते. बँक खाते उघडण्याचे फॉर्म, एफडी फॉर्म, कर्जाचे फॉर्म आदींवर सिराज अहमदने या सर्वांच्या सह्या घेतल्या. त्या बदल्यात सिराजने सर्वांना मालेगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. या 12 खात्यांव्यतिरिक्त सिराजने त्याच्या मित्रांच्या नावे आणखी दोन खाती उघडली होती.
153 बँक शाखांसह 2200 व्यवहार
मोहम्मद साजिद, (45, रा. मालेगाव), मोईन खान (40, रा. मालेगाव) ही खाती अनुक्रमे गंगासागर एंटरप्रायझेस आणि धनराज ऍग्रो या नावाने आहेत. ही 14 खाती 23 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान उघडण्यात आली होती. ईडीने नामको बँकेकडून सर्व 14 बँक खात्यांचे बँक स्टेटमेंट गोळा केले आहे. खाते उघडल्यापासून 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत (खाते गोठवण्यापर्यंत) एकूण 2200 व्यवहार झाले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील एकूण 153 बँक शाखांसह 2200 व्यवहार करण्यात आले आहेत.
5 बँक खाती गोठवली
या बँकांकडून एकूण कर्जाची रक्कम अंदाजे 112 कोटी रुपये आहे. ईडी या सर्व खात्यांची माहिती गोळा करत आहे. डेबिटचे 315 व्यवहार आहेत. या 315 व्यवहारांमध्ये 17 बँक शाखा आहेत. या सर्व 17 खात्यांमधून अंदाजे 111 कोटी रुपये डेबिट करण्यात आले आहेत. संशयित सिराज अहमदने 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान गंगासागर एंटरप्रायझेस आणि धनराज ऍग्रोकडून धनादेशाद्वारे 14 कोटी रुपये काढले आहेत. 14 कोटींपैकी 9.59 कोटी त्यांनी हवालाद्वारे मुंबईला पाठवले आहेत. उर्वरित पैसे अद्याप कळू शकलेली नाही. ईडीने मुंबईतील हवाला व्यक्तीची चौकशी केली आहे. ज्यामध्ये त्यांना पैसे घेणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली आहे. 17 पैकी दोन मालेगाव-बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँकेची खाती आहेत. ईडीने बँक ऑफ महाराष्ट्रातील सर्व खात्यांचे बँक स्टेटमेंट घेतले असून ज्यामध्ये एकूण पाच खात्यांचा समावेश आहे. KYC वरून या 14 व्यक्तींपैकी पाच व्यक्ती एकच असल्याचे समजते. ही सर्व 5 बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
कर चुकवेगिरीचा प्रयत्न?
तर उर्वरित बँका गुजरातमधील आहेत. यात सुमारे 45 कोटी रुपये प्रगती ट्रेडर्स आणि अहमदाबादच्या ॲक्सिस बँकेच्या एमके मार्केटिंगकडे गेले आहेत. ईडीने आरोपीच्या मालेगाव येथील घराची झडती घेतली असता तो 6 नोव्हेंबरपासून घरी आलेला नाही. प्रथमदर्शनी हा निवडणूक निधी असल्याचे दिसून येत नाही. संशयित काही कंपन्यांसाठी कर चुकवेगिरीचा प्रयत्न करत असल्याचेही शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आणखी वाचा