Pune Rape News Updates : पुण्यातील बंड गार्डन परिसरात (Bundgarden Police Station) नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका केवळ 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि सख्खा मामाने अत्याचार केला आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी समाजमाध्यमातून व्यक्त केली जात आहे.
बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर एका 29 वर्षाच्या एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरुन बंड गार्डन पोलिसांनी पिडित मुलीचे वडील आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षाची ही मुलगी कोरेगाव पार्क येथे असणार्या एका इंग्लिश मीडियम शाळेत शिकत आहे. याच शाळेत समुपदेशन सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी महिला विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत गेल्या होत्या, मुलींना त्या ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या 4 वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्याच वेळी घडलेला हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
तीन ते चार वर्षापासून अत्याचार
या साऱ्या प्रकाराला तीन ते चार वर्षापासून सुरुवात झाली. पहिल्यांदा 2017 मध्ये मुलगी बिहार येथे असताना आणि घरात कुणी नसताना तिच्या वडिलांनीच आपल्याच मुलीबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2020 मध्ये पीडित मुलगी ताडीवाला रोड येथे असताना तिच्या मोठ्या भावाने तिच्यावर जबरदस्ती करत तिला धमकी देखील दिली. यानंतर 2021 मध्ये देखील तिच्या आजोबांनी आणि चुलत मामांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केले.
आता या सगळ्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिली आहे.