नागपूर : भरमसाठ व्याज वसूल करून लोकांना देशोधडीला लावणाऱ्या अवैध सावकाराबद्दल "पठाणी व्याज" अशी शब्दावली वापरली जाते. मात्र, जर कोणी 4 लाखांच्या कर्जावर तब्ब्ल 97 लाखांची वसुली करू पाहत असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणणार? धक्कादायक म्हणजे चित्रपटातील सावकारांना देखील लाजवेल असं भरमसाठ व्याज वसूल करण्याचे प्रयत्न नागपुरात एका बडतर्फ पोलिसाने चालविले होते. मात्र, पीडित कर्जदाराने त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आता या माजी पोलिसावर अटक होण्याची वेळ आली आहे.
नागपूरच्या भगवान नगर भागात राहणाऱ्या मनीष राऊत नावाच्या व्यक्तीने जयंता शेलोट आणि त्याचा भाऊ विजय शेलोटकडून वर्ष 2016 मध्ये 4 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. काही आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी हे कर्ज घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष राऊत यांनी कर्जाची परतफेड म्हणून साडेसात लाख रुपये शेलोट यांना परतही केले होते. मात्र, कधीकाळी पोलीस दलात राहिलेल्या जयंता शेलोट यांनी मनीष राऊत यांना अडकवण्याचा प्लान बनवला आणि दमदाटी करत तुझे कर्ज अजून फिटलेलं नाही. व्याजासह मुद्दल 97 लाख रुपये झाली आहे. त्यामुळे तेवढे पैसे परत कर नाही तर तुझं घर आमच्या नावावर कर असा तगादा लावला होता.
घाबरलेल्या मनीष राऊत याने अनेक महिने इकडे-तिकडे लपून काढले. अखेरीस नेहमीच्या दमदाटीला त्रासून मनीष राऊत याने पोलिसांचे दार ठोठावले. अजनी पोलीस स्टेशनच्या पथकानं प्रकरणाचा सखोल तपास करून पूर्वश्रमीचा पोलीस कर्मचारी जयंता शेलोट आणि त्याच्या भावा विरोधात अवैध सावकारी आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींनी यापूर्वीही काही लोकांना अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आर्थिक शोषण केलं आहे. कोणाच्या संपत्ती बळकावल्या आहेत का? याचा तपास केला जात असल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :