औरंगाबाद : औरंगाबादसह अन्य शहारात कमोडीटी ट्रेडींगच्या नावाखाली 500 ते 700 लोकांना जवळपास 30 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दाम दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून या गँगने फसवले आहे. या गँगचा मोरक्या अक्षय उत्तम भुजबळ याच्या विरोधात तीन महिन्यापूर्वी फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या लोकांनी दिलेल्या माहीतीनुसार 2017 मध्ये अक्षय भुजबळ या 26-27 वर्षाच्या तरुणाने सिडको एन 2 भागात एस. एस. जे कमोडीटी या नावाने ऑफीस उघडले आणि त्याचा फसवणुकीचा धंदा सुरु केला. या तीन वर्षात वेगवेगळे आमिषे दाखवून त्याने शहरात एजंटचे जाळे तयार केले. चांगले ग्राहक आणणाऱ्या लोकांना चार चाकी गाडी, थायलंड, मलेशिया टूर अशी बक्षीसे दिली. शहराजवळील मोठ्या हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये सेमिनार आणि भोजनावळी दिल्या. अनेकांना डाऊन पेमेंट भरुन चारचाकी गाड्या घेवून दिल्या. जोपर्यंत हा खेळ चालला तोपर्यंत त्याचे हप्तेही भरले. हे सगळे पाहून अनेकांनी अक्षय आणि त्याच्या साथिदाराकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. अगदी 50 हजार रुपयांपासून 75 लाखापर्यंत काहांनी पैसा लावला.
काय होती स्कीम?
- 11 महिने गुंतवणुकीची स्कीम त्याने लोकांना पहिल्यांदा दिली.
- 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर 11 महिने 15 हजार रुपये मिळणार होते आणि 11 महिन्यानंतर मुद्दल 1 लाख रुपये परत मिळवण्याचं आश्वासन दिले गेले.
लोकांनी पैसे गुंतवल्यानंतर त्याने काही लोकांना 11 महिने परतावा देखील दिला. त्यामुळे लोकांना विश्वास बसला. आलेल्या पैशातून लोकांनी गाड्या घेतल्या, घराचे बांधकाम केले. त्यामुळे लोकांना अक्षयची खात्री पटली. त्यामुळे लोकांनी अधिक रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. अगदी मुलीच्या लग्नासाठी आणि घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसे देखील गुंतवले. ग्राहक आणणाऱ्या लोकांना पाच टक्के कमीशन अशी स्कीम देखील सुरु केली. त्यामुळे औरंगाबाद बरोबर इतर शहरात देखील त्याचे ग्राहक तयार फसले.
दोन वर्षात औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे, नाशिक या भागातील त्याची गुंतवणूक 20 कोटीच्या पुढे गेली आणि तो संपर्क कमी करत गेला. शेअर मार्केट डाऊन झाले आहे. गुजरातमधील एका कंपनीकडे आपले पैसे अडकले आहेत. असे तो पैसे गुंतवणाऱ्या लोकांना सांगत असे. काही लोक याच काळात आम्ही पोलिसांकडे जावू असे त्याला म्हणू लागले. तेव्हा तुम्हाला जायचे तर जा, माझ्यावर गुन्हा दाखल होईल. मात्र, तुम्हाला पैसे मिळणार नाही असे तो लोकांना सांगत. त्यामुळे लोकही पैसे मिळण्याच्या आशेने थांबत. आता तर तुम्हाला काही करायचे ते करा माझे कोणी काही वाकडे करु शकत नाही, असे तो लोकांना सांगतो.
अशाच फसवणुकीच्या प्रकारात पुण्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात अक्षय उत्तम भुजबळ, मंगल उत्तम भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादेतही फसवणूक झालेल्या लोकांनी ऑक्टोबर 20 मध्ये फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिस आयुक्तायात तक्रार अर्ज दिलाय.