Karnataka Crime News : कर्नाटकातील लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा (Lingayat Saint Shivamurthy Muruga) यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांनी जामीनही मंजूर करण्यात आला आहे. लिंगायत मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा यांना अटक केल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आल्याचं समजतं. 


अटक केल्यानंतर जामिनावर सुटका


या प्रकरणी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी शिवमूर्ती यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कर्नाटकातील चित्रदुर्ग इथं निदर्शनं करण्यात आलीय. लिंगायत समाजाच्या मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींनी म्हैसूरमधील ओदनदी सेवा या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेला त्यांच्यावरील अत्याचारांची माहिती दिल्यानंतर संस्थेनं ही माहिती जिल्हा बालकल्याण समितीला कळवली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली. 15 आणि 16 वर्षांच्या मुलींचं गेल्या साडेतीन वर्षांपासून शोषण करण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. 


कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शनं


या घटनेनंतर जनतेकडून संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शनं करण्यात येत आहेत. दोन अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर म्हैसूर शहर पोलिसांनी शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलींच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण होऊनही पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्याचबरोबर या घटनेला वाचा फोडणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात प्रवेश दिला नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.


पाहा व्हिडीओ : लिंगायत संत शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा



नेमकं प्रकरण काय आहे?


मिळालेल्या माहितीनुसार, लिंगायत मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींनी म्हैसूरमधील ‘ओदनदी सेवा संस्था’ या एनजीओशी संपर्क साधला होता. ही संस्था मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण झालेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींचा बचाव करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करते. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच या संस्थेनं ही बाब जिल्हा बालकल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


पीडित मुलींच्या तक्रारीनुसार, मुरुगा मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचे मागील साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. या प्रकरणी मठाच्या वसतिगृहाच्या वॉर्डनसह एकूण पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.