Latur Crime : लातूरमध्ये (Latur) 19 वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. परंतु ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. औषधोपचाराचा खर्च द्यावा म्हणून सासच्यांनी तगादा लावला होता, असंही विवाहितेच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. कोमल अजय बिराजदार असं 19 वर्षीय नवविवाहितेचं नाव असून आज (28 नोव्हेंबर) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. लातूर जिल्ह्यातील हेर कुमठा गावात घटना घडली. मृत नवविवाहिता ही मूळची नायगाव तालुक्यातील अल्लू वडगावची आहे.


औषधोपचारांचा खर्च द्यावा म्हणून सासरच्यांचा तगादा : नातेवाईक
उदगीर तालुक्यातील हेर कुमठा इथे एका नवविवाहित मुलीने आज सकाळी गळफास घेतला. हा गळफास नसून सासरच्या लोकांनी हत्या केली, असा आरोप नवविवाहितेच्या नातेवाईकांनी केला. यावर्षी मे महिन्यातच तिचं लग्न झालं होतं. कोमलची आई पापड बनवण्याचं काम करतं. मात्र लग्नानंतर काही दिवसातच कोमल सासरच्या जाचाला सामोरी गेली. सतत होणाऱ्या पैश्यांच्या मागणीमुळे ती त्रस्त होती. यातच काही दिवसांपूर्वी कोमल आजारी पडली. सोलापूर इथे तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यात दोन लाख रुपयांचा खर्च आला. त्यातील किमान एक लाख रुपये तरी माहेरवरुन घेऊन ये, असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता. काल रात्री तिचा गळा दाबून जीव घेण्यात आहे. आता आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.


तर मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांची भूमिका
उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. उदगीर इथल्या सरकारी दवाखान्यात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला आहे. तसंच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी मृत कोमलच्या नातेवाईकांनी केली आहे. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. इथून जाणार ही नाही, अशी भूमिका घेतली आहे.


विवाहितेच्या औषधोपचारांचा अर्धा खर्च द्यायला मी तयार होते. काही दिवसांची मुदत मागितली होती. मात्र त्यांनी ऐकले नाही. माझ्या मुलीचा जीव घेतला, असा आक्रोश मयत कोमलची आई उषा काशिनाथ कोठाळे करत असल्यामुळे नातेवाईक भावनिक झाले होते.


लातूरमधील अधिकाऱ्याच्या पत्नीची सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या
सोलापुरातील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरमधील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने सोलापुरातील हॉटेलमध्ये आत्महत्या केली. स्नेहलता प्रभू जाधव असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. स्नेहलता या लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी होत्या. स्नेहलता यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.