Coronavirus Cases Today in India : एकीकडे जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. देशात गेल्या 24 तासांत 293 नवीन रुग्ण आढळले असून सध्या देशात 5,123 उपचाराधीन रुग्ण आहेत. त्याआधी रविवारी देशात 343 रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं आज 52 कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत अनेक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात पाच हजारांहून अधिक कोरोना उपचाराधीन रुग्ण आहेत.


मुंबईत रविवारी 16 नवे कोरोनाबाधित


मुंबईत रविवारी 16 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली असून एकही मृत्यू झालेला नाही. यामुळे मुंबईतील कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 11 लाख 54 हजार 889 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 15 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 11 लाख 35 हजार 51 वर पोहोचली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा रिकव्हरी रेट 98.3 टक्के आहे. मुंबईत सध्या 95 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. नोव्हेंबरमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली घसरली आहे. 






महाराष्ट्रात 64 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही


महाराष्ट्रात रविवारी 64 नवीन कोरोना प्रकरणं नोंदवली गेली आहेत, तर एकही मृत्यू झालेला नाही. यामुळे आतापर्यंत राज्यातील रुग्णांची संख्या 81 लाख 35 हजार 684 झाली आहे. गेल्या 24 तासांत 117 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या 451 सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 63 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यात 155, नाशिकमध्ये 23 आणि अकोल्यात 31 रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 81 लाख 35 हजार 684 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


चीनमध्ये जनतेचा लॉकडाऊनला विरोध, 10 लोकांचा मृत्यू


जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोकं वर काढताना दिसत आहे. चीन, जपान, ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं दिसत आहे. चीनमध्ये रविवारी एका दिवसात 40 हजार रुग्णांची नोंद झाली. त्या आधी सलग तीन दिवस 30 हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र जनतेकडून लॉकडाऊनला विरोध करण्यात येत आहे. रविवारी झालेल्या निदर्शंन आणि आंदोलनात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.