Kurla Best Bus Accident मुंबई: कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये काल (9 डिसेंबर) रात्री 8.30 च्या सुमारास भरधाव वेगानं शिरलेल्या इलेक्ट्रिक बेस्ट बसनं (Kurla Best Bus Accident) अनेकांना धडक दिली. या अपघातामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनूसार 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 ते 50 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर बस जवळपास 8 ते 10 वाहनांना उडवत मार्केट परिसरात गेल्याची सीसीटीव्ही व्हिडीओद्वारे समोर आलं आहे.
सदर अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडलाय. तसेच या अपघातानंतर जमावाने बस चालकाला बेदम मारहाण केल्याचं देखील व्हिडीओद्वारे समोर आलं आहे. अपघात घडल्यानंतर बस चालक संजय मोरे याला नागरिकांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी धाडस दाखवत संजय मोरेला बाहेर काढलं आणि पोलीस स्थानकात घेऊन गेले.
कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक आज बंद-
अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले आहे. तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक आज बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
कुर्ला बस अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी करा- सचिन खरात
कुर्ला बस स्थानक वरून अंधेरी बस स्थानक येथे जात असताना कुर्ला आंबेडकर नगर येथे मोठा अपघात झाला आहे, या वस अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू आणि 48 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु वेळोवेळी नागरिकांनी मुंबईतील बस ड्रायव्हरची मोबाईलवर बोलत असतील तक्रार करून सुद्धा आणि भजी मुंबईमध्ये डागडुजी सुद्धा होत नाही, असे असून सुद्धा बेस्ट प्रशासन लक्ष देत नाही त्यामुळे असे अपघात होत आहेत, आणि कुर्ल्यातील घटना तर अत्यंत गंभीर आहे. म्हणून या बस अपघाताची सीआयडी चौकशी करण्यात यावी आणि मृत्यू पावलेल्यांना 50 लाखाची आणि जखमींना 10 लाखाची तातडीने राज्य सरकारने मदत द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.