कोल्हापूर : राज्यातील सर्वाधिक शांत शहर अशी ख्याती असलेल्या कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी अक्षरशः हैदोस घातल्याचं दिसून येतंय. निरपराध तरुणांची हत्या करण्यापर्यंत हे गुंड पोहोचले आहेत. स्टेटस वर चितवणीखोर रील्स लावून एका तरुणाची हत्या करण्यापर्यंत या गुंडांची मजल गेलेली आहे. पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावर हातबल झाल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापुरात रील स्टार गुंडांचा हैदोस...
- जिभेवर फिरवतात सटासट रेजर ब्लेड.
- हातात कोयते, तलवारी घेऊन नागरिकांना धमकावण्याचे प्रकार.
- रिल्सवर चितावणी खोर स्टेटस.
- चितावणीखोर रील ठेवण्यात अल्पवयीन मुलांचाही सहभाग.
- रील्स ठेवल्यानंतर दोनच दिवसात झाली एका तरुणाची हत्या.
- कोल्हापूर आणि गांधीनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे.
गुंडांचा हैदोस मात्र कोल्हापूर पोलिस सुस्त
B K Company आणि बरंच काही... ही कोणत्या हिंदी चित्रपटांची नावे नाहीत तर ही आहेत कोल्हापूर आणि गांधीनगर परिसरातील गुंडांच्या ग्रुपची नावे. गांजा आणि नशिल्या पदार्थांच्या आहारी गेलेले हे तरुण सध्या मोठ्या प्रमाणावर हातात कोयते, तलवारी घेऊन दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकंच नव्हे तर हातात तलवारी कोयते घेऊन चितावणी खोर रिल्स देखील स्टेटस वर ठेवत आहेत.
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गांधीनगर परिसरात 10 जानेवारीच्या रात्री विठ्ठल शिंदे या तरुणाची 6 ते 7 तरुणांनी निर्घृणपणे हत्या केली. विठ्ठलवर सपासप वार केल्याने विठ्ठलचा संपूर्ण चेहरा विद्रूप झाला. तर विठ्ठलच्या दोन्ही हातांची बोटे तुटली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून या प्रकरणातील 7 आरोपींना ताब्यात घेतलं. या 7 आरोपींपैकी 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत, तर उरलेले 5 आरोपी हे 21 आणि 23 वयोगटातील आहेत.
याच आरोपींनी गांधीनगरमध्ये मोबाईल स्टेटसवर रील्स ठेवून स्वतःची दहशत निर्माण केली आहे. हातात कोयते आणि तलवारी घेणारे रील्स मोठ्या प्रमाणात वायरल केल्याने गांधीनगर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे
कोल्हापुरात एका बाजूला आरोपींना दुग्धाभिषेक घातला जातोय. तर दुसऱ्या बाजूला आरोपी वेगवेगळे रील्स ठेवून दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रकारावरून कोल्हापुरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलीस हतबल झालेले आहेत. या फाळकूट दादांचे रिल्स पोलिसांना आव्हान ठरत आहेत. त्यामुळे या रील्सवर आता पोलिसांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली आहे.
या रील स्टार्स गाव गुंडांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला नाही तर सामान्य नागरिकच या गावगुंडांचा बंदोबस्त करतील आणि यातून आपली सुटका करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
ही बातमी वाचा: