कल्याण:  टिटवाळा मांडा (Kalyan Titwala News) येथे धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा घेण्यासाठी पत्नीकडे तगादा लावूनही तिने माहेरहून पैसे न आणल्याने पतीने तिची हत्या (Husband Killed His Wife) केली. पत्नीच्या हत्येची वाच्यता होऊ नये यासाठी तिचा मृतदेह ड्रममध्ये टाकला आणि हा ड्रम जंगलात फेकला. मात्र, पोलिसांनी नराधम पतीला बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीची ही हत्या सुनियोजित असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या चार दिवसांपूर्वीच आरोपीने घरात ड्रम आणून ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


अलीमुन आणि मैनुद्दीन यांचा गेली 12 वर्षांपासून गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मैनुद्दीन हा पत्नी अलिमून हिचा शारीरिक मानसिक छळ करत होता. याबाबतची तक्रार मृत अलिमूनने आपल्या आई-वडिलांकडे केली होती.  गेल्या काही वर्षांपासून आरोपी मैनुद्दीनने  पत्नी अलीमूनकडे माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. अलीमूनच्या आई-वडिलांनी कसेबसे त्याला 80 हजार रुपयापर्यंतची मदत केली. मात्र, मैनुद्दीन हा त्यावर थांबला नाही. रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये तू तुझ्या आई-वडिलांकडून  घेऊन ये नाहीतर तुला जिवे मारेल अशी धमकी देत असे. अलीमूनच्या आई-वडिलांनी समजूत काढल्यानंतर मैनुद्दीन हा काही दिवस शांत असायचा. मात्र, पुन्हा त्याच्याकडून पत्नीला त्रास देण्याचा प्रकार सुरू होत असे. 


आज सकाळपासून मैनुद्दीनने आपल्या पत्नीला आई-वडिलांकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. मुलगा शाळेत पाठवल्यानंतर दोघांमध्ये आपसात वाद झाले आणि मैनुद्दीनने पत्नी अलीमुन हिच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालत नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरून एका जंगलामध्ये फेकून दिला. नेहमीप्रमाणेच आईने मुलगी अलीमून हिला फोन केला. मुलगी फोन का उचलत नाही यावर आई गडबडली आणि तिने जावयाला फोन केला. जावई मैनुद्दीनने तुझ्या मुलीची मी हत्या केली आहे तिला ड्रममध्ये भरून एका जंगलात फेकून दिले असल्याचे सांगितले. आता मी पोलीस स्टेशनमध्ये असून तू पोलीस स्टेशनला ये असे सांगितले. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मैनुद्दीन याने पाणी भरण्यासाठी 250 लिटरचा ड्रम बाजारातून घेऊन आला होता. घरामध्ये पाणी भरण्यासाठी इतर ड्रम असतानाही त्याने मुद्दामहून मोठा ड्रम घरी घेऊन आला आणि याच ड्रममध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरला. त्यानंतर एकट्याने रिक्षामध्ये ड्रम भरला आणि जंगलामध्ये टाकून दिला असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीनंतर कल्याण ग्रामीण पोलिसांनी तातडीने अंबरनाथकडे जाणाऱ्या एका रस्त्यावरील जंगलामध्ये पडलेला ड्रम पोलिसांनी उघडला. त्यामध्ये अलीमून हिचा मृतदेह आढळला.