Adani Group : रविवारी झालेल्या मतमोजणीत चार पैकी तीन राज्यात भाजपाला (BJP Won Assembly Elections) विजय मिळाला. भाजपाला मिळालेल्या यशाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारात (Share Market) दिसून आला. शेअर बाजारात आज गुंतवणुकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने बाजारात तेजी दिसून आली. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) सेन्सेक्स 1384 अंकांच्या उसळीसह 68,865 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) निफ्टी 419 अंकांच्या उसळीसह 20,686 अंकांवर बंद झाला. या काळात अदानी समूहाचे (Adani Group) सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत एका दिवसात 5.6 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
आज सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले. दोन्ही निर्देशांकात असलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.83 लाख कोटींची वाढ झाली. आज बाजार भांडवल 337.67 लाख कोटींहून 343.51 लाख कोटी इतके झाले.
अदानी समुहाच्या शेअर्स दरात वाढ
आज दिवसभरातील व्यवहारात अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी वाढ झाली. गुंतवणूकदारांचा अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याकडे कल दिसून आला.
अदानी समुहातील कंपनी | किती टक्क्यांनी वधारला |
अदानी एंटरप्रायझेस | 6.30 टक्के |
अदानी पोर्ट्स | 5.33 टक्के |
ग्रीन एनर्जी | 7.55 टक्के |
एनर्जी सोल्यूशन | 6 टक्के |
अदानी विल्मर | 2.70 टक्के |
अदानी पॉवर | 5.60 टक्के |
अदानी टोटल गॅस | 5 टक्के |
एसीसी | 3.60 टक्के |
अंबुजा | 4.70 टक्के |
एनडीटीव्ही | 4.10 टक्के |
आजच्या तेजीनंतर अदानी समूहाच्या एकूण बाजार भांडवलाने 12 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्याच्या एका आठवड्यानंतर, यावर्षी 31 जानेवारी रोजी खाली घसरल्यानंतर ही पहिल्यांदाच बाजार भांडवलाने इतका टप्पा ओलांडला.
हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या बाजार भांडवलात मोठी घट झाली होती. त्यानंतर समूहातील कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 6.8 लाख कोटी इतक्या नीचांकी पातळीवर पोहचले. त्यानंतर अदानी समूह सावरू लागला आहे. नीचांकी बाजार भांडवलापासून 90 टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, सर्वकालिक उच्चांक असलेल्या 24.8 लाख कोटींच्या टप्प्यापेक्षा हा 50 टक्क्यांनी कमी आहे.
हिंडेनबर्ग अहवालाचा अदानी समुहाला मोठा फटका
या वर्षी 24 जानेवारी हा अदानी समूहासाठी सर्वात वाईट दिवस ठरला. अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या FPO च्या आधी एक अहवाल प्रकाशित केला. यामध्ये अदानी ग्रुपवर अनेक आरोप करण्यात आले होते. दुसऱ्याच दिवसापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरू झाली. अनेक दिवसांच्या घसरणीमुळे अदानी समूहाचे मोठे नुकसान झाले.