ठाणे : कल्याणमधील मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने दोनच दिवसांपूर्वी 13 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची हत्या केली. या आरोपीने या आधीही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचं समोर आलं आहे. 2023 साली त्याने एका शाळकरी मुलीवर भररस्त्यात अतिप्रसंग केला होता.पीडित मुलीच्या आईने एबीपी माझाला ही माहिती दिली.
नेमका घटनाक्रम काय होता?
या घटनेबद्दल त्या मुलीच्या आईने सांगितलं की, आपली मुलगी ही तब्येत बिघडल्याने शाळेतून लवकर घरी येत होती. विशाल गवळीने त्या मुलीच्या मागून येऊन तिचे तोंड पकडले. पण कसंतरी करून मुलगी त्याच्या तावडीतून सुटली. त्या ठिकाणी इतर दोन-तीन लोक होते. पण त्यांनी काहीही हस्तक्षेप केला नाही. नंतर आपले पती आणि मुलगा जाब विचारण्यासाठी गेले. त्यावर त्यांनाच मारहाण झाली.
या घटनेनंतर आपण स्थानिक नगरसेवकाकडे गेल्याचं पीडित मुलीच्या आईने सांगितलं. पण नगरसेवकांनी यात काहीही करू शकत नाही असं सांगत पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर पोलिस तक्रार दिली. त्या प्रकरणी विशाल गवळीला शिक्षा झाली. पण दोन महिन्यात तो बाहेर आला.
आरोपीची या भागात दहशत असल्याचं पीडितेच्या आईने सांगितलं. या भागातील मुलींचा पाठलाग करणे, लोकांना शिव्या देणे आणि मारणे अशी कामे आरोपी करत असल्याचं पीडितेच्या आईने सांगितलं.
आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी
कल्याणमधील मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशाल गवळीला बुधवारी शेगावमधून अटक केल्यानंतर त्याला गुरुवारी सकाळी कल्याणमध्ये आणण्यात आलं. सुरुवातीला तो ठाणे क्राईम ब्रांचच्या ताब्यात होता, त्यानंतर त्याला कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी त्याला कल्याण कोर्टात हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
कोण आहे आरोपी विशाल गवळी?
- विशाल गवळी हा बदलापूरच्या अक्षय शिंदे पेक्षाही विकृत.
- विशाल गवळीच्या दोन बायका सोडून गेल्या आणि तिसरी बायको खासगी बँकेत नोकरीला आहे.
- बलात्कार,बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड, लैगिंक शोषण असे अनेक गुन्हे विशालवर दाखल.
- कल्याण पूर्व परिसरात त्याची दहशत आहे. त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंबांचं स्थलांतर झालं आहे.
- विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय असल्याची माहिती समोर.
ही बातमी वाचा: