Kalyan Crime : मुंब्रा परिसरातून मोटारसायकल चोरी करुन कल्याण डोंबिवलीमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिजवान शेख आणि महंमद कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून या आरोपींवर कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 17 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चार मोटारसायकल असा एकूण 6 लाख 90 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महात्मा फुले पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याणमध्ये एका वृद्ध महिलेची पहाटे मॉर्निंग वॉक करत असताना दोन दुचाकी चोरट्यांनी धूम स्टाईलने चैन चोरली होती. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलीस तपास सुरु होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आठ दिवसात रिजवान शेख आणि महंमद कुरेशी नावाच्या दोन सराईत चोरट्यांना मुंब्रा येथे सापळा रचून अटक केली. तपासादरम्यान दोघे सराईत चोरटे असल्याचे समोर आले. या दोघांविरोधात कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात 17 गुन्हे दाखल असून आतापर्यंत त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात 5, बाजारपेठ पोलीस ठाण्यात 2, मुंब्रा मालवण आणि वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 अशा एकूण दहा गुन्ह्यांची कबुली दिली. पकडले जाऊ नये म्हणून हे दोघे चोरटे चेन स्नॅचिंग करण्यासाठी बाईक चोरी करायचे आणि त्याच चोरी केलेल्या बाईकवर चेन स्नॅचिंग करायचे.
केक शॉपमध्ये चोरी करणारा चोरटा गजाआड
तर कल्याणमध्येच केक शॉपमध्ये केक घेण्याच्या बहाण्याने आलेल्या एका तरुणाने दुकानातील 30 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत महात्मा फुले पोलिसांनी मंदार जैयस्वाल या चोरट्याला अटक केली आहे. चोरीस गेलेली रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
संबंधित बातम्या