कल्याण : कल्याण पूर्वमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका मुलीच्या मदतीने सात तरुण संबंधित तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. या त्रासाला कंटाळून या तरुणीने इमारतीवरुन उडी घेत आयुष्य संपवलं.
या प्रकरणी तरुणीचा मोबाईल फोनचा तपास करत त्यात आढळलेल्या सुसाईड नोटच्या आधारे कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. ही तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या सात तरुणांना मदत करत होती. पोलिसांनी या आठही जणांना अटक केली आहे. हे आरोपी कल्याणमधील एका नामांकित बिल्डरची मुलं आसून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. आमच्या जीवाला धोका आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
कल्याण पूर्व परिसरात एका तरुणीने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या मुलीने बारावीची परीक्षा दिली होती नुकताच तिचा निकालही आला होता. बारावीच्या परीक्षेत तिला 71 तक्के पडले होते. तिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईल फोनमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळली. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. सुसाईड नोटमधील मजकुरामुळे पोलीसही थक्क झाले. संबंधित मयत तरुणीला याच परिसरात राहणारे सात तरुण व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे या सात विकृत नराधमांना एक तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पीडितेची मैत्रीण होती. पोलिसांनी या प्रकणात आठ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल अशी अटक आरोपींची नावे आहेत. यामधील कृष्णा जयस्वाल आणि काजल जयस्वाल हे भाऊ बहिण आहेत. दरम्यान अटक केलेल्या आरोपींमध्ये काही जण कल्याणमधील धनदांडग्या बिल्डरचे मुलं असल्याची माहिती समोर येत आहे .
याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी आमच्या मुलीसोबत बलात्कार झाला आहे. तिला ढकललं की तिने आत्महत्या केली याचा तपास पोलिसांनी करावा. तिला ब्लॅकमेल केलं जात होतं. बलात्काराची कलमं का लावली नाहीत? कल्याणमधील एका मोठ्या बिल्डरची मुलं यात सहभागी आहेl, आरोपीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, बिल्डरकडून आमच्यावर देखील दबाव आणला जात आहे, आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला देखील पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या