Kalyan News : पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना (Police) संतप्त पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हाताला आणि डोक्याला चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. कल्याण (Kalyan) पूर्वेकडील विजयनगरमध्ये असलेल्या एका सोसायटीत हा प्रकार घडला. कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोर पतीला (Husband) ताब्यात घेतले असून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेशनाथ निवृत्ती घुगे आणि हवालदार सांगळे अशी मारहाण झालेल्या पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणी तक्रारदार महिलेचा पती महेश माने (रा. धनलक्ष्मी सोसायटी, विजयनगर, कल्याण पूर्व) याच्या विरुद्ध हवालदार नागेशनाथ घुगे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
पती पत्नीला मारहाण करत असल्याचा पोलिसांना फोन
रविवारी (9 एप्रिल) रात्री साडेबाराच्या सुमारास ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातून (Police Control Room) कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) संपर्क करण्यात आला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर भागात आसलेल्या एका सोसायटीत पती आपल्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत आहे. त्या महिलेला मदतीची गरज असल्याने तातडीने त्याठिकाणी जाण्याच्या सूचना वरिष्ठांनी हवालदार घुगे आणि सांगळे यांना दिल्या. पोलीस तक्रारदार महिलेच्या घरी गेल्यावर तिथे महेश माने हा पत्नीला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करुन तिला मारहाण करत होता.
तुम्ही मला सांगणारे कोण? म्हणत पतीची पोलिसांना मारहाण
घुगे आणि सांगळे यांनी पती महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले. तुम्ही मला सांगणारे कोण? असा प्रश्न करत आरोपी महेश याने पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करत त्यांना घराबाहेर फरफटत नेले. इमारतीखालील वाहनतळावरील दुचाकीवर हवालदार घुगे यांना लोटून दिले. यात हवालदार घुगे यांना गंभीर दुखापत झाली.
अधिकची मदत मागवली, आरोपीवर गुन्हा दाखल
संतप्त महेश माने हा दोन्ही पोलिसांना दाद देत नसल्याने पोलिसांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलीस कुमक मागवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने आणि शोध पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महेशला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याच्यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा