Crime News: कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लॉकअपचा लोखंडी गज वाकवून आरोपी फरार झाल्याची घटना कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे आणि त्यानंतर एकच  खळबळ पसरली आहे.


विविध पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हे दाखल


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार झालेला रेकॉर्डवरचा आरोपी राम सखाराम काकड (वय 19 वर्ष) सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पालघर, ठाणे ग्रामीण, नाशिक हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात 25 मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.


रात्री 3 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास आरोपी फरार


महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीतील लॉकअपमध्ये कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाऱ्याला ठेवण्यात आले होते. मोटार सायकल चोरीतील हा सराईत गुन्हेगार आहे. रात्री 3 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास लॉकअपचा गज वाकवून हा आरोपी पळून गेला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


आरोपी गज वाकवून पळून गेल्याने पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह


पहारेकरी असलेले कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे ASI रामचंद्र मिसाळ यांनी तसेच इतर गार्ड अंमलदार यांनी आरोपीचा पाठलाग केला, परंतु आरोपी अंधाराच्या दिशेने पळून बाजूच्या भिंतीवरून उडी मारून पसार झाला. आरोपी गज वाकवून पळून जाईपर्यंत पोलीस काय करत होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


कल्याण पोलीस ठाण्यात याआधीही घडले भयानक प्रकार


पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना संतप्त पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हाताला आणि डोक्याला चावा घेतल्याची घटना एप्रिलमध्येच समोर आली होती. कल्याण पूर्वेकडील विजयनगरमध्ये असलेल्या एका सोसायटीत हा प्रकार घडला, त्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


रविवारी (9 एप्रिल) रात्री साडेबाराच्या सुमारास ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करण्यात आला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर भागात आसलेल्या एका सोसायटीत पती आपल्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत आहे. त्या महिलेला मदतीची गरज असल्याने तातडीने त्याठिकाणी जाण्याच्या सूचना वरिष्ठांनी हवालदार घुगे आणि सांगळे यांना दिल्या. पोलीस तक्रारदार महिलेच्या घरी गेल्यावर तिथे महेश माने हा पत्नीला अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करुन तिला मारहाण करत होता. 


घुगे आणि सांगळे यांनी पती महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले. तुम्ही मला सांगणारे कोण? असा प्रश्न करत आरोपी महेश याने पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करत त्यांना घराबाहेर फरफटत नेले. इमारतीखालील वाहनतळावरील दुचाकीवर हवालदार घुगे यांना लोटून दिले. यात हवालदार घुगे यांना गंभीर दुखापत झाली.


हेही वाचा:


Beed News : बीडमध्ये सैराटची पुनरावृत्ती? आंतरजातीय विवाह केलेलं जोडपं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलं