Maharashtra Cabinet Expansion : मागील काही दिवसांपासून राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार तूर्तास तरी बचावले आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात इच्छुकांची मोठी यादी आहे. सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांनी 'फिल्डिंग' लावली आहे. यात आता पुणे जिल्ह्यातील कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळतं याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
आता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जवळपास 20 नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात येईल अशी चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून काही नावांची यादी तयार करण्यात येत आहे. तर, काही नावांची चाचपणी दोन्ही पक्षाकडून सुरु आहे. मंत्रिमंडळासाठी पुण्यातूनही काही नावांचा विचार केला जात आहे. त्यामुळे पुण्यातून कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
महेश लांडगे, राहुल कुल, माधुरी मिसाळ यांची नावं चर्चेत
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) , दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) आणि पुणे शहरातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राज्याने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्याने पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट स्थान आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा आहे. माधुरी मिसाळ, राहुल कुल, महेश लांडगे यांची नावे समोर आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांची यापूर्वीच भेट घेतली होती. ते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यानंतर शिंदे-फडणीस सरकारमध्ये एकही महिला मंत्र्याचा समावेश नाही आहे त्यामुळे पुण्यातील एकमेव महिला आमदार माधुरी मिसाळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये एक संधी
पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये किमान एका नेत्याला मंत्रीपद मिळावं, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून होतं आहे. त्यात महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना यंदा संधी मिळते का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी लांडगेंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही नेमकी कोणाला संधी मिळणार आणि कोणत्या आमदाराची ताकद कामाला येणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.