Kalyan Crime Update : जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन भावांचा मृत्यू झाला तर एक भाऊ गंभीररित्या जखमी झाला होता. 12 वर्षानंतर या प्रकरणात आरोपी हल्लेखोर संजय पाटील याला जन्मठेपेची शिक्षा कल्याण कोर्टाने सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूने तपास करत चांगल्या पद्धतीने आरोप पत्र दाखल केल्याने आरोपीला शिक्षा मिळाली आहे. 


कल्याण पश्चिमेकडील रामदास वाडी परिसरात राहणाऱ्या अशोक देवकर, कृष्णा देवकर आणि रामदास देवकर या तीन भावांचे याच परिसरात राहणाऱ्या संजय पाटील व मनोज खांडगे यांच्यासोबत भांडण झाले होते. 3 डिसेंबर 2010 च्या रात्री कल्याण पश्चिमेकडील रामदास वाडी परिसरात रात्री पावणे बाराच्या सुमारास अशोक देवकर ,कृष्णा देवकर आणि रामदास देवकर हे रस्त्यावर गप्पा मारत फिरत होते.


याच वेळी संजय पाटील व मनोज खांडगे हे दोघे जण बाईक वर आले. मनोज खांडगे बाईक चालवत होता तर संजय पाटील नावाचा व्यक्ती पाठीमागे बसला होता. संजय पाटील यांच्या हातात धारदार शस्त्र होते. जुन्या भांडणाचा राग या दोघांच्या मनात होता. याच रागातून बाईकवरून खाली उतरताच संजय पाटील याने अशोक देवकर यांच्यावर हल्ला केला. नंतर कृष्णा देवकर याच्यावर हल्ला केला. मध्यस्थी करण्यास आलेल्या रामदास याच्यावर देखील त्यांनी हल्ला केला. 


या हल्ल्यात अशोक व कृष्णा देवकर यांचा मृत्यू झाला तर रामदास गंभीर जखमी झाले होते, त्यांचा जीव बचावला. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय पाटील व मनोज खांडगे या दोघांना 24 तासात अटक करण्यात आली.


या प्रकरणात कल्याण मधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी आरोपी विरोधात सबळ व भक्कम पुरावे गोळा करत दोषारोपपत्र कल्याण कोर्टात दाखल केले. या घटनेच्या दोन वर्षानंतर मनोज खांडगे यांचा मृत्यू झाला. अखेर 12 वर्षानंतर या प्रकरणात आरोपी संजय पाटील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


इतर बातम्या