कल्याण : फेसबुकच्या इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून श्रीमंत लोकांशी मैत्री करायची.. प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे ..त्यानंतर एकांतात बोलवून कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध  देऊन  त्यांच्याजवळील लाखोंचा मुद्देमाल घेऊन पसार व्हायचे, अशा पद्धतीने आपल्या सौंदर्यांच्या बळावर श्रीमंत लोकांना लुबाडणाऱ्या एका महिलेला तिच्या एका साथीदारासह अटक केली आहे. समृध्दी खडपकर असे या महिलेचे नाव असून विलेंडर डीकोस्टा असे तिच्या साथीदाराचे नाव आहे. समृद्धीने अशाप्रकारे आज दहा ते बारा जणांना फसवले आहे. तसेच आणखी जणांना तिने फसवले असावे असा संशय पोलिसांना आहे.  पोलिसांनी तिच्याकडून मोबाईल फोन, दागिने, रिव्हॉलवर असा एकूण वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


महिनाभरापूर्वी डोंबिवलीतील एका केबल व्यवसायिकाची फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेची ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले.  सदर महिलेने त्याला एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलवले होते. हॉटेलमध्ये गप्पा मारताना सदर महिला या व्यावसायिकाला लॉजमध्ये घेऊन गेली. तिथे व्यवसायिक बाथरूममध्ये जाताच या महिलेने त्याचे रिव्हॉल्वर, सोन्याच्या चेन ,मोबाईल घेऊन पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.  रिव्हॉल्वर चोरीला गेल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनील तारमळे व अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरू केला.


फेसबुकवर या महिलेचा शोध घेण्यात आला तिचे नाव मिळतात तिच्या नावावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची शहानिशा पोलिसांनी सुरू केली.  या दरम्यान पोलिसांना डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात या महिला विरोधात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. महिला मुंबई येथे राहत असल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी तिचा शोध घेतला. मात्र ती तिथून गोव्याला गेल्याचे समजले. अखेर पोलिसांच्या पथकाने गोवा येथे जाऊन संबंधित महिला समृद्धी खडपकर व तिचा साथीदार विलेंडर डीकोस्टा या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.


 या महिलेकडे चौकशी केली असता तिने याआधी अनेक लोकांची संपर्क साधून अशाच पद्धतीने त्यांना लुबाडल्याची कबुली दिली. बदनामीच्या भीतीने काही लोकांनी तक्रार केली नव्हती. त्यामुळे तिचे मनोबल वाढले व तिने असे अनेक प्रकार केल्याचे देखील उघड झालं. समृद्धीकडून समृद्धी आणि तिच्या साथीदार विलंडर यांच्याकडून पोलिसांनी 16 मोबाईल, एक रिव्हॉल्वर, महागडे घड्याळ, सोन्याचे दागिने असा 20 लाख 81 हजारांचे दागिने जप्त केले आहेत. एसीपी सुनील कुराडे यांनी याबाबत फेसबुकवर होणाऱ्या मैत्रीला भुलून जाऊ नये, त्यांच्या आमिषाला बळी पडू नये जेणे करून फसवणूक होणार नाही असे आवाहन केले आहे.