Kalicharan Maharaj : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं आणि शिवराळ भाषा वापरणारा कालीचरण महाराजला काल (गुरुवारी) नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. कालीचरण महाराजाला आज (शुक्रवारी) ठाणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. वर्धा पोलिसांकडून त्याची कस्टडी आता नौपाडा पोलिसांनी घेतली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून कालीचरण बाबाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यामुळं कालीचरणवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. 


काय म्हणाला होता कालीचरण महाराज


"मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी 1947 मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज याने केले आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 




कालीचरण महाराज आहे तरी कोण? 


'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजाची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाही. त्याचं मूळ नाव 'अभिजीत धनंजय सराग' असं आहे. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना 'महाराज' असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले. 


पाहा व्हिडीओ : Thane Kalicharan Baba Arrested कालीचरण बाबा नौपाडा पोलिसांच्या ताब्यात, करणार ठाणे कोर्टात हजर



शिवतांडव स्त्रोत गायल्याने झाली होती देशभरात ओळख  


जवळपास दीड वर्षांपूर्व कालीचरण महाराजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत कालीचरण महाराजाने तन्मयतेने सुंदरपणे शिवतांडव स्त्रोत गायले होते. एका तरुण साधूने गायलेल्या या शिवतांडव स्त्रोतामुळे कालीचरण महाराज अधिक प्रसिद्ध झाला. मध्यप्रदेशातील भोजपुर येथील एका शिवमंदिरात हे 'शिवतांडव स्त्रोत' गायलं होतं. या व्हिडिओनंतर महाराजाची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. 


निवडणुकीच्या रिंगणात कालीचरण महाराज 


कालीचरण महाराजाने 2017 मध्ये झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं.  मात्र, कालीचरण महाराजाचा या निवडणुकीत पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा