रायगड : आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याखाली (Atrocity Case)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बुधवारी महाड इथं मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

Continues below advertisement


जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आव्हाड यांनी चवदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला. या मनुस्मृती दहन आंदोलनात त्यांच्याकडून मनुस्मृती (Manusmriti) पुस्तकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडण्यात आला. यानंतर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. आता त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जितेंद्र आव्हाडांसह 24 जणांवर गुन्हा दाखल


जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाड शहरातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यासह एकूण 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आव्हांडावर विरोधकांची जोरदार टीका


आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील चवदार तळ्यावर मनुस्मृती जाळून आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. त्याप्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर करवाई व्हावी, अशी मागणी केली होती. शिवाय महाड पोलिस प्रशासनाकडून आचारसंहितेच्या भंग म्हणून नोटीस दिली होती. मात्र आव्हाड यांनी आंदोलन केलं, यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या कलमांतर्गत गुन्हे दाखल


भा.द.वि. कलम 1860 नुसार सेक्शन 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(1), महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार सेक्शन 37(3), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सेक्शन 135 या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.