जालना : पैशाच्या वादातून एका व्यावसायिकाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना समोर आली असून काल सकाळी 6 च्या सुमारास शहरातील अंबड (Jalna) चौफुली येथे एका कारमध्ये व्यावसायिक सागर धानोरे यांचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेह शेजारी एक पिस्टल आढळून आल्याने सुरवातीला ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. मात्र, पोलिसांनी कसून तपासणी आणि तांत्रिक विश्लेषण करत सीसीटीव्हीच्या आधारे ही हत्या असल्याचं उघड केलं. पोलिसांनी (Police) याप्रकरणातील आरोपीही शोधून काढले आहेत. दरम्यान, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला जालना जवळील टोलनाक्यावरुन ताब्यात घेतले. 

Continues below advertisement

व्यवसायिक हत्या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कमलेश झाडीवाले आणि कल्याण भोजने यांना अटक केली. दरम्यान, आरोपी कल्याण भोजने आणि मयत यांच्यात पैशाच्या व्यवहार होता, याच व्यवहारातून आरोपी कल्याण भोजने याने कमलेश झाडीवाले याला हत्येची सुपारी दिल्याचे समोर आलं आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी कल्याण भोजने याच्या सांगण्यावरून आरोपी कमलेश झाडीवाले याने शहरातील आंबड चौफुली परिसरामध्ये मयताच्या कारमध्ये बसून त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्यामानेवरती पिस्टलमधून दोन राउंड फायर केले. तसेच धारदार शस्त्राने त्याच्यावरती वार करत त्याची हत्या देखील केली. दरम्यान संशयित आरोपी झाडीवाले कारमधून उतरतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केल्यानंतर तपासाला वेग आला अन् या हत्याकांडाचे गुढ उलगडलं. 

दरम्यान, पोलिसांनी या हत्येचे आणखी कोणते कांगोरे आहेत का? याचा देखील कसून तपास सुरू केल्याची माहिती जालन्याचे डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी दिली.  

Continues below advertisement

पोलिसांनी असा केला तपास

रविवारी सकाळी कारमध्ये मृतदेह आढळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झालं आणि ड्रायव्हर सीटजवळ पिस्टलसह दोन मोबाईल पोलिसांच्या हाती लागले. गाडीतील आणि शस्त्रावरील ठसे, पुरावे बारकाईने जतन करण्यात आले आणि इथूनच या प्रकरणाचा धागा उलगडू लागला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे मोर्चा वळवला. फुटेज तपासताना एक महत्त्वाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्याचं दिसून आलं. आरोपी कमलेश झाडीवाले मयताच्या कारमधून उतरताना स्पष्टपणे दिसत होता. हा दृश्य पुरावा मिळताच आत्महत्येचा हा बनाव असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि तपासाला वेग आला. दरम्यान, आरोपीने चलाखी दाखवत हत्येच्या दुसऱ्याच दिवशी मयताच्या नातेवाईकांसोबत पोस्टमार्टमसाठी संभाजीनगर गाठलं. आपण संशयाच्या भोवऱ्यात येणार नाही, असा त्याचा अंदाज होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजने त्याची पोलखोल केली होती. पोलिसांनी त्याचा माग घेत संभाजीनगरहून परतताना जालना जवळील टोलनाक्यावर त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस चौकशीत आरोपीने अखेर गुपित उघड केलं आणि सहआरोपी कल्याण भोजने याचं नाव पुढे आलं. तांत्रिक विश्लेषण आणि ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत, आत्महत्येचा बनाव असलेली ही थरारक हत्या उघडकीस आणली.

हेही वाचा

''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...