Maharashtra Jalna Crime News : जालना (Jalna News) जिल्ह्यातील परतूर मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर धारदार कुर्‍हाडीचे घाव करत निर्घृणपणे खून केला आणि त्यानंतर कुर्‍हाडीसह स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. रविवारी परतूर येथे घडलेल्या या घटनेनंतर जालना जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतूर शहरातील सावतानगर भागातील शेख मुसा यांच्या मालकीच्या खोलीमध्ये मिलिंद नारायण पाडेवार (25) हा इसम पत्नीसह दोन महिन्यापासून भाड्यानं वास्तव्यास आहे. मिलिंद पाडेवार हा त्याची पत्नी प्रतीक्षा (22) हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. प्रतीक्षा साधं फोनवर बोलले तरीही मिलिंद तिच्यासोबत वाद घालायचा. दरम्यान रविवारी दुपारी प्रतिक्षा ही फोनवर बोलत होती. तेवढ्यात मिलींद तिथे आला. पण यावेळी मिलिंदने कोणतेही विचारपूस न करता थेट प्रतिक्षा हिच्यावर डोक्यावर कुर्‍हाडीने सात ते आठ वार केले. यामध्ये प्रतीक्षा गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.


स्वतः कुऱ्हाड घरून पोलीस ठाण्यात पोहचला.…


प्रतीक्षाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेणाऱ्या मिलिंदने रविवारी तिची हत्या केली. मात्र प्रतिक्षा हिच्यावर डोक्यावर ज्या कुर्‍हाडीने वार केले, त्या रक्ताने माखलेल्या कुर्‍हाडीसह मिलिंद स्वतः थेट परतूर पोलीस ठाण्यात हजर झाला. मिलिंदला आशा अवस्थेत पाहून पोलिसांना देखील धक्काच बसला. पण त्याने घडलेला सर्व प्रकार सांगताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.


आपण आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती मिलिंदने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिल्याने, परतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रतीक्षाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आरोपी मिलिंद विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.