जालना: जिल्ह्यातील मंठा येथे एका खाजगी बँकेच्या वसुली अधिकाऱ्याच्या खुनाचे गूढ जालना पोलिसांना उलघडले आहे. हा खून 'बोल्ड गे' अॅप वरून ओळख झालेल्या मित्राने केल्याचं निष्पन्न झालं आहे. जालना जिल्ह्यातील मंठा येथे 8 एप्रिल रोजी बाजार समितीच्या आवारात पोलिसांना एक प्रेत आढळून आलं होतं. वैद्यकीय अहवालानंतर हा खून झाल्याचं उघड झालं होतं.


प्रदीप कायंदे असं मृत व्यक्तीचं नाव असून तो एका खासगी बँकेचा वसुली अधिकारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात मयताच्या मोबाईलवरून माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे दोन आरोपींचा शोध घेतला. सोपान बोराडे आणि प्रकाश बोराडे असे आरोपींचे नाव असून त्यांनी मयत हा घरी आला असता त्याच्याशी वाद घालून डोक्यात काठी मारून त्याची हत्या केल्याच उघड झालंय. 


आरोपींनी या खुनाची कबुली दिली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय. मयत व्यक्ती आणि आरोपी यांची 'बोल्ड गे' या समलैंगिक अॅपच्या माध्यमातून ओळख झाल्याची माहिती आहे. 


भंडारा जिल्ह्यातील खुनाचा गुन्हा उघड


भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवडाभरापूर्वी जळालेल्या आणि पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अतिफ लतिफ शेख (वय 29 वर्षे) आणि फैजल परवेझ खान (वय 18 वर्षे) अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांवर संबंधित व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे.


लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 13 एप्रिलला जळालेल्या आणि पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.  संबंधित मृत पुरुष हा 30 ते 40 वर्ष वयोगटातील होता. ज्याच्या दिवशी मृतदेह आढळल्या, त्याच्या आठवडाभर आधी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. शिवाय त्याची हत्या झाली असावी असाही पोलिसांचा अंदाज होता. 


यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मृत व्यक्ती नागपुरातील असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचं समोर आलं. याबाबत अधिक माहिती अशी की, 2017 पासून सुरु असलेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी आधी माफी मागितली. नंतर दुश्मनी दोस्तीत बदलायची, असं सांगत गोडीगुलाबीने बोलून नागपुरातील तरुणाला चारचाकी वाहनाने फिरायला भंडाऱ्यात आणलं. मग लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात मारहाण करत ओढणीने गळा आवळून नंतर डिझेल अंगावर टाकून जाळून टाकलं.