Crime News: कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या इराणी कबिल्यात गेल्या 2 वर्षांपासून आतापर्यत पोलिसांनी 100 हून अधिक सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत, यातच आता इराणी कबिल्यात ब्युटी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणीला पोलिसांनी पकडताच ती ड्रग डीलर असल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सबा सैय्यद असे ड्रग डीलर तरुणीचे नाव आहे. ही तरुणी पोलिसांच्या तावडीत सापडल्याने तपासात मोठे घबाड मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहरासह आसपासच्या शहरांत विविध प्रकारच्या अंमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विरोधात विविध पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांकडून नशेच्या सौदागरांना सापळा रचून मुद्देमालासह अटक करण्याचे सत्र सुरुच आहे.
कल्याण-कसारा लोहमार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाच्या लागून असलेल्या इराणी कबिल्यात राहणारी सबा ही आंबिवली, मोहने, तसेच आसपासच्या परिसरात मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जसह चरस, गांजा या अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याची गुप्त माहिती कल्याणमधील खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.
या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी खडकपाडा पोलीस पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवली परिसरात असेलेल्या एका बेकरीसमोर सापळा रचला होता. त्यावेळी इराणी कबिल्यातील सबा ही संशयित रित्या आढळून आली असता, पोलीस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. त्यानंतर सबाची पोलिसांनी अधिक चौकशी करून झाडाझडती घेतली असता तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला .
दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी तिच्याकडून एमडी ड्रग्जसह चरस, गांजा हस्तगत करून तिच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पोलिसांच्या अटकेत असलेल्या ड्रग डीलर सबाला बुधवारी (24 मे) कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, तिला न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्स आणि चरस, गांजा आरोपी सबाने कुठून आणले? आणि ती कोणाला विक्री करत होती? याचा तपास आता खडकपाडा पोलीस करत आहेत.
तीन दिवसांपूर्वीच भिवंडीतील सौदागर मोहल्ल्यात राहणाऱ्या एका नशेच्या सौदागाराला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडीतील गजबजलेल्या मंडई भागातील बाजारपेठेतून बेड्या ठोकल्या होत्या. जमशेद ताबीज अन्सारी (वय 32, रा. सौदागर मोहल्ला, भोईवाडा) असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याजवळ 1 लाख 12 हजार रुपये किमतीचा 16.50 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला होता.
हेही बातम्या: