Saurabh Tripathi:अंगडिया खंडणी प्रकरणात (Angadia extortion case) आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्रिपाठी यांनी याप्रकरणी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयाने यावर सुनावणी करत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन अर्जात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलीस स्टेशन स्तरावर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात असल्याची माहितीही त्यांना नव्हती. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की, त्रिपाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करत आहेत.
याच दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये अंगडिया असोसिएशनने मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की, त्रिपाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करत आहेत. या गंभीर आरोपांनंतरच त्रिपाठी यांना राज्यातील गृहमंत्रालयाने निलंबित केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या प्राथमिक तपासादरम्यान एका पेन ड्राईव्हमधील एक ऑडिओ रेकॉर्डिंग तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द केली होती. ज्यामध्ये अंगडिया व्यापारी त्यांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी त्रिपाठी यांना आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, म्हणून त्यांना लाच देण्याचे आमिष दाखवल्याचे बोललं जात आहे.
या प्रकरणाचा तपास करणार्या गुन्हे शाखेला संशय आहे की, त्रिपाठी यांनी पेन ड्राइव्हमध्ये दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग टेम्पर केले असावे. गुन्हे शाखेला असेही आढळून आले की, त्रिपाठी यांनी कथितपणे एलटी मार्गाच्या पोलीस अधिकार्यांना अंगडिया व्यावसायिकांवर छापे टाकण्यास सांगितले, जेणेकरून ते अंगडियावर दबाव आणू शकतील आणि त्यांच्याकडून महिन्याला 10 लाख रुपये वसूल शकतील.
सावंत यांच्यासमोर आपली बाजू मांडताना त्रिपाठी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी आपल्या बचावात एक ऑडिओ रेकॉर्डिंग दिली सावंत यांना दिली. ज्याद्वारे त्यांना अंगडियांचा गट आपल्याला भेटला होता. तसेच त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या अंगडिया व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, म्हणून दरमहिन्याला लाच देण्याची ऑफर केली होती, हे सिद्ध करता यावे.
याच दरम्यान आंगडिया व्यवसायिकांनीही या संबंधित एक ऑडिओ क्लिप मुंबई पोलिसांकडे दिली होती. ज्यामध्ये त्रिपाठी अंगडिया व्यावसायिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यास सांगत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2021 ते जानेवारी 2022 पर्यंत त्रिपाठी यांनी हवाला नेटवर्क वापरून मुंबईतून सुमारे 59 लाख रुपये हस्तांतरित केले आहेत. त्यापैकी 19.5 लाख रुपये या प्रकरणाशी संबंधित आहेत. उर्वरित पैसे इतर प्रकरणाशी संबंधित असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने असेही सांगितले की, अंगडियाच्या या तक्रारीच्या आधारे ते तपास करत होते, परंतु तपासादरम्यान त्यांना एक साक्षीदार सापडला. ज्याने नोव्हेंबरमध्ये त्रिपाठीच्या सांगण्यावरून पैसे पाठवल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिना हस्तांतरित केलेल्या पैशांचा तपास केला असता 40 लाख रुपयांबद्दल नवी माहिती समोर आली.
दरम्यान, गुन्हे शाखेने आतापर्यंत 30 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले असून त्यात अंगडिया व्यावसायिक आणि पोलिसांचा समावेश आहे. तसेच एलटी मार्गाचे वरिष्ठ पीआय असलेले गुन्हे शाखेचे एसीपी यांचाही जबाब गुन्हे शाखेने नोंदवला आहे. या वसुलीची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी आपल्या जबानीत सांगितले.