Crime News: एका महिलेने ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या डिलिव्हरी बॉयवर तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. याबाबत महिलेने एक ट्वीट केले आहे, जे सध्या व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत या महिलेने सांगितले की, डिलिव्हरी बॉय तिच्या घरी किराणा सामान पोहोचवण्यासाठी आला होता. पण त्यानंतर त्याने मला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला आणि लिहिलं की, 'मी तुला खूप मिस करत आहे.' एकामागून एक अनेक मेसेज पाठवून त्याने महिलेला त्रास दिल्याचं सांगण्यात येत आहे.


@prapthi_m या ट्विटर युजरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मला खात्री आहे की अनेक महिलांना या समस्येचा सामना करावा लागला असेल. या महिलेने सांगितल्या प्रमाणे, तिला मंगळवारी रात्री @SwiggyInstamart वरून किराणा सामानाची डिलिव्हरी मिळाली. त्यानंतर स्विगीचा डिलिव्हरी बॉय तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवू लागला.


महिलेने व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला


या पीडित महिलेने डिलिव्हरी बॉयसोबत झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात डिलिव्हरी बॉयने समोरून महिलेला हाय लिहून मेसेज केल्याचं दिसत आहे. याला उत्तर देताना महिलेने विचारले कोण आहे? तर समोरून रिप्लाय आला की, मला तुझी खूप आठवण येत आहे. यानंतर तो लिहितो की तुझे सौंदर्य, वागणूक, डोळे खूप चांगले आहेत. शेवटी तो लिहितो की, मला हे सगळं आठवतंय.


डिलिव्हरी बॉयकडून तिला त्रास देण्याची ही पहिलीच वेळ नाही, असं महिलेने सांगितले. महिलेने डिलिव्हरी बॉयची तक्रार सर्व्हिस प्रोव्हायडरकडे केली असल्याचेही सांगितले आहे. महिलेने सांगितले की, तिने याबाबत तक्रार करूनही स्विगीच्या कस्टमर केअर टीमकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, नंतर स्विगीची एस्केलेशन टीम आणि त्यांच्या सीईओ कार्यालयाने महिला युजरशी संपर्क साधला आणि असे आश्वासन दिले की ते पुन्हा असे होऊ नये म्हणून सर्व आवश्यक उपाययोजना करतील.