बीड : कौटुंबिक वादातून गुन्हेगारी घटना घडतात, त्यातच पती-पत्नीचा वाद ही नित्याचीच बाब असते. मात्र, पती-पत्नीच्या वादातून टोकाला गेलेला वाद दोन जीवांच्या मृत्यूचे कारण बनला. बीड शहरात ही ह्रदयद्रावक घटना उगडकीस आली. पतीने उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वत: देखील दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) शहरात उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (police) व्यक्त केला आहे. मात्र, मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


राधा वायभट (वय 26) व भागवत वायभट अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. भागवत हा रिक्षाचालक असून बीड शहरात किरायाचे घर करुन कुटूंबासह रहात होता. शनिवारी रात्री तो घरी आला, त्यावेळी पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळीये त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यानंतर मध्यरात्रीच डोक्याखाली घेण्याच्या उशिने पत्नीचे तोंड दाबले. त्यामध्ये गुदमरुन राधाचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर स्वत: देखील दरवाजाबाहेर असलेल्या हुकाला दोरी अडकवून भागवतने गळफास घेतला.


सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीने हा प्रकार पाहिला. आई आणि वडिलांच्या भांडणाचा झालेला शेवट पाहून, चिमुकलीने रडायला सुरूवात केली. त्यामुळे खालच्या मजल्यावरील लोक वरच्या मजल्यावर गेले. त्यावेळी, शेजारच्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शहरातील शिवाजीनगर पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. 


दरम्यान, पती-पत्नीच्या किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने अंगावर शहारे आणणारी घटना घडली. मात्र, या घटनेत कुठलाही दोष नसलेल्या चिमुकलीच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हवरवले, 5 वर्षाची चिमुकली पोरकी झाली. त्यामुळे, परिसरात व नातेवाईकांत हळहळ व्यक्त होत आहे.