Gondia Crime News : गोंदिया (GondiaNews) जिल्ह्यातील महसुल विभागाला हादरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. गोंदिया (GondiaNews) जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  (ACB Trap) मोठी कारवाई केली आहे. यात गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणाची कारवाई अगोदर गोरेगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व संशयित आरोपींना पुढील तपास आणि कारवाई करिता गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे. 


वाळू वाहतूक प्रकरणी लाच घेणं चांगलंच भोवलं


मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील एका फिर्यादीने तक्रार दिली होती. दिलेल्या या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली होती. यात गोरेगावचे तहसीलदार किशन के. भदाणे, नायब तहसिलदार नागपुरे आणि गणवीर नामक एक खाजगी व्यक्तीचा समावेश आहे. हे प्रकरण उघडकीस येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे.


राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अशीच एक कारवाई चंद्रपुर जिल्ह्यात देखील केली आहे. यात चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकासह तीन बडे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 1 लाखांच्या लाचेची मागणी करणे या तिघा अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील एका बियर शॉपच्या परवानगीसाठी एका अर्जदाराने अर्ज  केला होता. मात्र 6 महिने लोटूनही यावर कुठलीही प्रक्रिया पुढे झाली नाही. परिणामी, या बाबत अर्जदाराने विचारणा केली असता, अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर अर्जदाराने या बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आणि सापळा रचत हे प्रकरण उघडकीस आणले. 


या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर यापैकी खारोडे आणि खताळ यांना सध्या ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या