Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जुनेवानी गावाच्या जवळ एका व्यापार्याला बंदुकीच्या धाकावर आरोपींनी लुटपाट (Crime News) केल्याची घटना उघडकीस आली आहे. 21 जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यातील फिर्यादी गौरव निनावे आणि त्याचा मित्र आकाश नंदरधने हे लग्नासाठी पलाश रिसॉर्ट दांडेगाव येथे गेले होते. दरम्यान लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना रात्री 12 वाजताच्या सुमारास गाडी जुनेवानी गावाकडे निघाली असता समोरून पल्सर गाडीवर 3 जण आले. गौरव याने त्यांना पत्ता विचारले असता आरोपींनी गाडीचा काच खाली करण्यास सांगितले.
दरम्यान, काच खाली करताच तिन्ही अज्ञातांनी हवेत गोळीबार (Gondia Crime News) करून गौरवच्या कपाळावर बंदूक ठेवली आणि त्यांनतर बळजबरीने दरोडा टाकत अज्ञात आरोपींनी सोनं व रोख रक्कम असा 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर गौरव निनावे यांनी पोलीस ठाणे गाठत या घटनेची तक्रार नोंदविली असून या प्रकरणी गंगाझरी पोलिसात (Gondia Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पोलिसांकडून आता कसून तपास सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
छत्तीसगड राज्यातून रेतीची वाहतूक, पोलिसांची मोठी कारवाई
गोंदिया लगतच्या छत्तीसगड राज्यातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक व एका ट्रॅक्टरवर देवरी पोलिसांनी कारवाई केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर चेक पोस्ट या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. छत्तीसगड राज्यातून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामध्ये ही रेतीची वाहतूक करण्यात येणार होती. मात्र, देवरी पोलिसांनी शिरपूर चेक पोस्टवर दोन्ही ट्रकला थांबून चौकशी केली असता त्यांच्याकडे अवैध रेती साठा असल्याचे समजले. यावरून देवरी पोलिसांनी कारवाई केली आहे. दोन्ही कारवाई मध्ये जवळपास एक लाखांपेक्षा अधिक चा रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे.. या प्रकरणी देवरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक
भंडारा जिल्ह्यातून गडचिरोलीकडं जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. लाखांदूर तालुक्यातील करांडला, राजणी, सरांडी बुद्रुक आणि घरतोडा या गावातील शेतकऱ्यांची शेती समृद्धी महामार्गात जात आहे. मात्र राज्य सरकारनं अजूनही भूसंपादन करण्यात येत असलेल्या शेतीला किती दर देण्यात येत आहे याची माहिती दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या समृद्धी महामार्गाला प्रचंड विरोध दर्शविला आहे. शेतीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भूसंपादन करण्यात येत असलेल्या शेतीचा अगोदर दर सांगा नंतरचं शेतीची मोजणी करा, असं ठणकावून सांगत मोजणीसाठी आलेल्यांना आल्यापावली परतवून लावलं. मागील आठवड्यात या समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवीताना शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या