Walmik Karad Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड न्यायालयाने आज (22 जानेवारी) वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराडला बुधवारी (22 जानेवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मिक कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का, हे बघावे लागेल. मात्र, मकोका लागल्याने वाल्मिक कराडला तुर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.


दरम्यान, वाल्मिक कराड याने 31 डिसेंबरला पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्कारली होती. तेव्हापासून वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी मध्यंतरीच्या काळात त्याच्या सुटकेसाठी परळी आणि आष्टी परिसरात निदर्शने केली होती. यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. एरवी न्यायालयीन कोठडीतील आरोपीला जामीन मिळणे सोपे असते. मात्र, वाल्मिक कराडला मकोका लागल्याने त्याला जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे.


विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आला होता, मोठा पुरावा हाती-


वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं बोललं जात आहे. 




संबंधित बातमी:


Walmik Karad : अबब...! वाल्मिक कराड किती रुपयांचा टॅक्स भरायचा?; धक्कादायक आकडेवारी आली समोर