Gondia News गोंदिया : कुक्कुट पालन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शेड बांधकामाचे बिल काढून देण्याच्या नावावर लाच घेणाऱ्यांना मदत करणे पशुधन पर्यवेक्षकाला भोवलं आहे. या प्रकरणी गोंदिया (Gondia News) पंचायत समितीतील पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Buero) अटक केली आहे. तेजराम हौसलाल रहांगडाले (वय 57 वर्ष) असे या गोंदिया पंचायत समिती वर्ग-3 च्या पशुधन पर्यवेक्षक संशयित आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2023 ला 10 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्याला मदत केल्याच्या  आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.  तर तपसाअंती घटनेच्या तब्बल 9 महिन्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही अटकेची कारवाई केली आहे.


लाच घेणाऱ्यांना मदत करणे पशुधन पर्यवेक्षकाला भोवलं


या प्रकरणातील तक्रारदार यांना महाराष्ट्र शासनाचे नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत 1000 मांसल कुक्कुट पक्षीगट योजनेअंतर्गत कुक्कुट पालनाकरीता शेड मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, उभारणी केलेल्या शेडकरिता शासनाकडुन योजनेतंर्गत मिळणाऱ्या अनुदानाचे दुसऱ्या हप्त्याचे 1 लाख रुपयांचा धनादेश मिळणार होता. ही रक्कम काढुन देण्याकरीता गोंदिया पंचायत समितीतील प्रभारी पशुधन विकास अधिकारी (वर्ग-1) आणि संशयित आरोपी जयंतप्रकाश ईश्वरदास करवाडे (वय 39 वर्ष ) यांनी त्यांना 12 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदार यांच्या तक्रारीवरून 3 ऑगस्ट 2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत कारवाई केली होती. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 


परिणामी, या प्रकरणातील संशयित आरोपी प्रभारी पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश करवाडे यास खाजगी व्यक्ति महेन्द्र हगरु घरडे (वय 50 वर्ष ) याच्या माध्यमातून तडजोडीअंती 10 हजार रुपये स्विकारताना ताब्यात घेतले होते. तर दोघांच्या विरोधात 4 ऑगस्ट 2023 रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. 512/2023 कलम 7, 12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद केला होता.


दरम्यान, वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांनी तपास केले असता, गोंदिया पंचायत समितीतील संशयित आरोपी पशुधन पर्यवेक्षक तेजराज रहांगडाले याने पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश करवाडे आणि खासगी इसम महेंद्र घरडे यांना लाच रक्कम स्विकारण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल मंगळवारी  पशुधन पर्यवेक्षक तेजराम रहांगडाले यांना अटक केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या