Maharashtra Rain News : राज्यातील बहुतांश भागात सुरूअसलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. काही भागात अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्यातील  बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर या पावसाचा सर्वाधिक जोर हा मुंबई, मुंबई उपनगर, कोकणसह विदर्भात  बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालिन यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहे.


अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टमोडवर 


मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सोबतच सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.


सर्व यंत्रणेला मुख्यमंत्र्यांच्या सूचना 


दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत.  पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी.


हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.


हे ही वाचा