Nagpur Crime : 'एका व्यक्तीचा आपण खून केला आहे' असा मजकूर स्टॅम्प पेपरवर लिहून त्याखाली एका महिलेची स्वाक्षरी घेऊन तिला खुनाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्या महिलेकडून 15 लाख रुपये उकळल्याची घटना नागपुरात (Nagpur) समोर आली आहे. याप्रकरणी नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी अमित तिवारी आणि रेणुका तिवारी या तिशीतल्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.


काय आहे प्रकरण?
अमित तिवारी हा सीताबर्डी बाजारात कपडे विकण्याचे काम करतो. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर आधीच खून आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या जरिपटका इथली एक महिला ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याने ती कर्जबाजारी झाली होती. त्यात तिने आपल्या भावाकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. हे एक लाख रुपये फेडण्यासाठी त्या महिलेने आरोपी अमित तिवारीची पत्नी रेणुका तिवारी हिच्याशी संपर्क साधला. पीडित महिला जेव्हा पैसे घ्यायला आली तेव्हा आरोपी दाम्पत्याने एका स्टॅम्प पेपरवर तिची सही घेतली. स्टॅम्प पेपरमध्ये काय लिहिलं आहे याकडे त्या पीडित महिलेने लक्ष दिले नाही. काही दिवसानंतर या स्टॅम्प पेपरवर "या महिलेने रेणुकाच्या चुलत सासऱ्याचा खून केला" असा मजकूर लिहिला असल्याचे आरोपी दाम्पत्याने तिला सांगितलं. स्टॅम्प पेपरवर पीडित महिलेची स्वाक्षरी असल्याने हा खुनाचा कबुली जबाब असल्याचे सांगत, कधीही न झालेल्या खुनाच्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत पीडित महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळायला सुरुवात केली. 


वर्षभराच्या काळात आरोपी दाम्पत्याने पीडित महिलेकडून तब्बल 15 लाख रुपये उकळले. शेवटी आणखी पैसे देणं कठीण झाल्याने या महिलेने आपल्या घरी ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी या प्रकरणी तिवारी दाम्पत्याला अटक केली आहे.


मॅट्रिमोनियल साईटवरुन 15 महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या ठगाला बेड्या
सीताबर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लग्न करतो म्हणून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका ठगाला अटक केली होती. भिकन माळी असं आरोपीचं नावं आहे. भिकनला जुगार, सट्ट्याचे व्यसन असून तो अशाच प्रकारे महिलांची फसवणूक करुन पैसे घेतो आणि ते जुगारात उडवतो. तसंच भिकन विवाहित आहे आणि पत्नी व मुलांपासून वेगळा राहतो, अशी माहिती चौकशीतून समोर आली. भिकन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करायचा. वेगवेगळ्या बहाण्याने त्यांना जाळ्यात अडकवून पैसे उकळायचा. त्याने 15 महिलांना चुना लावल्याचं समोर आलं आहे.