Aurangabad Crime News : औरंगाबादच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा पकडला आहे. यावेळी विविध ब्रँडची विदेशी मद्याच्या 1 हजार 68 बॉक्ससह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत एकूण 1 कोटी 8 हजार 920  रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे यांचे समवेत शुल्क विभाग कचनेर ते करमाड रोडवर संयुक्तरित्या वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी रोडवर टाटा कंपनीचा ट्रक वाहन क्रमांक एम.एच 17 वी.वाय 5166 संशयितरित्या जातांना पाहायला मिळाले. त्यामुळे पथकाने ट्रक थांबून तपासणी केली. यावेळी वाहन चालक फरीद लालाभाई पठाण (वय 57 वर्षे रा. देवी गल्लीळ, संगमनेर ता. संगमनेर जि. अहमदनगर) याची चौकशी केली असता ट्रकमध्ये विविध ब्रँडची विदेशी मद्याचे 1068 बॉक्स असल्याचे समोर आले.


यावेळी पथकाने ट्रक चालकाकडे विदेशी मद्य घेऊन वाहतूक करण्याचा परवाना तपासला असता दारू वाहतुकीचा मार्ग दिंडोरी - धुळे जळगाव नागपूर असा नमूद केलेला होता. मात्र असे असताना ट्रक चालक चुकीच्या मार्गाने कचनेर - फाट्याजवळ, बिडकीन कचनेर-करमाड रोडने काद्राबाद शिवारात वाहतूक करत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे ट्रक चालकास ताब्यात घेत पोलिसांनी ट्रकही ताब्यात घेतला आहे. 


जप्त केलेला मद्यसाठा



  • ब्लेंडर स्प्राईट व्हिस्की 750 मि.ली. क्षेमतेचे 100 बॉक्स 

  • रॉयल स्टॅग व्हिस्की 750 मिली क्षमतेचे 52 बॉक्स

  • इम्पिरिअरल ब्ल्यू व्हिस्की 180 मि.ली. क्षेमतेचे 860 बॉक्स

  • मास्टर ब्लेंड विस्की 180 मि.ली. क्षेमतेचे 56 बॉक्स

  • एकूण विदेशी मद्याची 1068 बॉक्स जप्त करण्यात आले.

  • ट्रकसह अंदाजे 1 कोटी 8 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या प्रकरणी गुन्हा दाखल 


वाहतुकीचा मार्ग दिंडोरी - धुळे जळगाव नागपूर असा असतांना देखील चुकीच्या मार्गाने कचनेर - फाट्या जवळ, बिडकीन कचनेर-करमाड रोडने काद्राबाद शिवारात वाहतूक करत असल्याने ट्रक चालक फरीद लालाभाई पठाण याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.