बीड : अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा (Fake Medicine) पुरवठा झाल्यानंतर दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी द्विसदस्य चौकशी समिती स्थापना करण्यात आली आहे. यानंतर राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 


राज्यात शासकीय संस्थांमध्ये अप्रमाणित औषधे येत असल्याची बाब जानेवारी 2024 पासूनच समोर यायला सुरुवात झाली होती. हे सत्र सुरू झाल्यानंतर औषध विभागाला जाग आली. यानंतर याबाबत पडताळणीची मोहीम सुरू करण्यात आली. या पडताळणीतून अस्तित्वात नसलेल्या पाच बोगस कंपन्यांकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर औषध पुरवठा झाल्याची बाब समोर आली. या औषधांवर उत्पादक म्हणून केरळ, उत्तराखंड, आंध्र प्रदेशच्या कंपन्यांची नावे होती. औषध विभागाने त्या त्या राज्यांच्या औषध नियंत्रकांकडून माहिती मागवल्यानंतर प्रत्यक्षात या ठिकाणी या कंपन्याच नसल्याचे निदर्शनास आले होते. औषध विभागाचे आयुक्त डी. आर. गव्हाणे यांनी 3 ऑक्टोबर 2024 रोजी पत्र काढून 5 बनावट कंपन्यांची नावे देऊन या कंपन्यांकडून औषध पुरवठा कुठे झालाय, याबाबत माहिती मागवली होती. 


या आहेत पाच कंपन्या बनावट


1) म्रिस्टल फॉम्र्युलेशन, उत्तराखंड


2) रिफंट फार्मा, केरळ 


3) कॉम्युलेशन, आंध्र प्रदेश


4) मेलवॉन बायोसायन्सेस, केरळ


5) एसएमएन लॅब, उत्तराखंड


सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांवर गंभीर आरोप


दरम्यान, शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधं सापडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी तत्कालिन आरोग्यमंत्री तानाजी सावंत व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्यावर गंभीर आरोप केला. गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्या या गुजरातच्या आहेत. अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून गोळ्यांची खरेदी कशी केली? आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या खात्याकडून हापकिन्सकडून औषधांचा पुरवठा थांबवण्यात आला आणि एक नवीन प्राधिकरण तयार करण्यात आले. तानाजी सावंत यांनी ठरवून एक समांतर यंत्रणा उभी केली. तानाजी सावंत आणि धर्मरावबाबा अत्राम यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


राज्यात बनावट औषध पुरवठ्याचा सुळसुळाट; शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, तपासात धक्कादायक माहिती उघड 


धक्कादायक! बीडच्या अंबाजोगाई पाठोपाठ वर्धा अन् भिवंडीतही बनावट औषधांचा पुरवठा, चौघांवर गुन्हा दाखल आंतरराज्य टोळीचा समावेश?