छत्रपती संभाजीनगर : एकीकडे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळत नाही. तर दुसरीकडे दिवसागणिक डोक्यावर कर्जाचा वाढत्या भाराच्या दडपणाखाली एका तरुण मराठा आंदोलकाने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवलीय. हे कृत्य करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या भावाला व्हॉट्सऍपवर मॅसेज करत आपल्या आत्महत्येचे कारणही सांगितले आहे. ही खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दत्ता कालीदास महिपाल असे आत्महत्या करणाऱ्या या 25 वर्षे तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ती आपल्या भावाला व्हाट्सएपवर पाठवली होती. मृत दत्ता हा मूळचा बीड जिल्ह्यातील संभाजीनगरच्या वाळूज भागातील वडगाव कोल्हाटी या गावात राहत होता. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनात तो सक्रिय होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती मिळत आहे.
25 वर्षीय मराठा आंदोलकाने उचलले टोकाचे पाऊल
काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते. जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) या आंदोलनानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. या काळात विशेषत: मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी प्रचंड आक्रमक झाला होता. हे आंदोलन दीर्घकाळ सुरु होते. यादरम्यान काही मराठा तरुणांनी सरकार आरक्षणाची मागणी मान्य करत नसल्याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली होती. हा मुद्दा तेव्हा चांगलाच गाजला होता. राज्य सरकारने त्यावेळी आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करुन हा रोष शमविण्याचा प्रयत्न केला होता.
महिपाल कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मराठा समाजातील तरुणांना आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी वेळोवेळी आवाहन केले आहे. मात्र, असे असले तरी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचा हा सिलसिला काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचे दिसतंय. बीड जिल्ह्यातील संभाजीनगरच्या वाळूज भागातील वडगाव कोल्हाटी या गावातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय दत्ता महिपाल याच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. तर ऐन उमेदीच्या वयात घरतील तरुण मुलाच्या मृत्यूमुळे महिपाल कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
सॉरी मम्मी-पप्पा..! सुखी रहा...तुमचा दत्ता...
I love you bro and miss you all मी दत्ता कालिदास महिपाल पाटिल. काही कारणाणुसार फाशी घेत आहे. तसेच गोपाल अर्बन माजलगाव या बँकेकडून मी 1 लाख रपये घेतले होते. पण काही कारणामुळे काही हफ्ते भरले नाही. मला रोज फोन येते होते.मला खूप त्रास झाला. मोठ उद्योगपती कर्ज घेतात आणि भरत सोडून पळून जातात. त्यात विजय माल्ल्या असेल किंवा निरव मोदी असेल त्याना कोणी काही बोलत नाही. पण शेतकऱ्यानांच सर्व बोलतात. दूसरे कारण म्हणजे मराठा आरक्षण मिळत नाही. कारण काय आहे मी उपोषण करून फायदा झाला नाही. सरकारने त्याची भरपाई करावी (सौरी मम्मी-पप्पा, सुखी रहा... तुमचा दत्ता..
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणावर
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी 4 जून पासून पुन्हा एकदा उपोषण करत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मनोज जरांगे यांनी उपोषण करू नये, त्यांची तब्येत ही खालावलेले असून डॉक्टरांनी त्यांना उपोषण करू नये, असा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आदेश द्यावा, आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत असा अशी भूमिका अहमदनगर येथील मराठा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. सरकारने देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा विचार करावा, असं देखील मराठा बांधवांनी म्हंटल आहे. त्यामुळे लोकसभा निडणुकांच्या निकाला नंतर मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या