अहमदाबाद : देशात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मंगळवार 7 मे रोजी मतदान पार पडले. महाराष्ट्रातील 11 जागांवरील उमेदवारांसाठी मतदान (Voting) घेण्यात आले. त्यामध्ये, बारामती, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह विविध मतदारसंघात उत्साहात आणि उत्स्फूर्त मतदान झाले. मात्र, काही ठिकाणी मतदानाच्या घटनेला गालबोट लागण्याचे काम झाले. सोलापूर जिल्ह्यतील सांगोला येथे चक्क ईव्हीएम (EVM) मशिन पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे गुजरातच्या दाहोद लोकसभा मतदारसंघात भाजपा सदस्यांना अटक करण्यात आली आहे. बोगस मतदाना केल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपींनी मतदान केंद्रावरच लाईव्ह स्ट्रीमींगही केलं होतं.  सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. 


काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून, आरोपींनी 25 मतदान केंद्रांचा दौरा केला होता, यावेळी संतरामपूरमधील गोबिथ येथे बोगस मतदान केलं. विशेष म्हणजे यातील एक आरोपी विजय भाभोरने ह्या संपूर्ण घटनेचं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डींगही केलं होतं. त्यामध्ये, भाभोर हा एक बुधवरील मतदान केंद्रात एंट्री करतो, त्यानंतर ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड करताना दिसून येतो. तर, निवडणूक अधिकाऱ्यालाही दमदाटी करताना आरोपी लाईव्हमध्ये दिसून येत आहे. 


आम्हाला केवळ 10 मिनिटे द्या, आम्ही इथेच बसून आहोत. ही ईव्हीएम मशिन माझ्या वडिलांची आहे, असे म्हणत आरोप भाभोर हा इतरही सहकाऱ्यांना कमळाचे बटण दाबण्याचा आग्रह करतो. या क्षेत्रात आपला दबदबा असल्याचे सांगत ईव्हीम मशिनसोबत नाचताना आरोपी भाभोर दिसून येतो. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 


महिसागरचे पोलीस अधीक्षक जयदिपसंह जडेजा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, याप्रकरणी दोघांवर प्रतिबंधक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील प्रथमपूर मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. विजय भाभोर आणि मनोज मगन अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील विजय भाभोरचे वडिल रमेश भाभोर हे संतरामपूर येथील तालुक पंचायत समितीचे सभापती आहेत. दरम्यान, आरोपींवर आयपीसीच्या कलम 171 आणि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरुन काँग्रेसने संताप व्यक्त केला असून भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. येथील प्रशासन अधिकाऱ्यांसमोर आरोपी फेसबुक लाईव्ह करुन बोगस मतदान करत आहेत, ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचंही काँग्रसने तक्रारीत म्हटलं आहे. 






आव्हाड यांचंही ट्विट


दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करुन गुजरातमधील घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. भाजपा खासदाराच्या मुलाने ईव्हीएमसोबत इंस्टाग्राम लाईव्ह केल्याची घटना त्यांनी ट्विटरवरुन निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, भाजप 'चारशे पार'चा नारा कशाच्या बळावर देतंय माहित नाही, पण या असल्या लोकशाही विरोधी कृत्यातून ते आपला खरा आणि भेसूर चेहरा जगाला दाखवून देत आहेत,हे मात्र नक्की, अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.