ED Action on Chinese Loan App Case : चायनीज लोन अ‍ॅपप्रकरणी (Chinese Loan App Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने ऑनलाईन पेमेंट गेटवे म्हणजे ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपवरील 47 कोटी रुपयांचा निधी गोठवला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चिनी लोन अ‍ॅप (Chinese Loan App) प्रकरणात अलिकडेच छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी ईडीने ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपवरील निधी गोठवत मोठी कारवाई केली आहे. चिनी कर्ज अ‍ॅपद्वारे चीन भारतीयांचा डेटा चोरी करत असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु आहे. 


ईडीने पेमेंट गेटवेमध्ये ठेवलेले 47 कोटी रुपये गोठवले


ईडीने (ED) शुक्रवारी चिनी कर्ज अ‍ॅप प्रकरणात पेमेंट गेटवे Easebuzz, Razorpay, Cashfree, Paytm मध्ये ठेवलेला 46.67 कोटी रुपयांचा निधी गोठवला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी काही पेमेंट गेटवे आणि कर्जदारांवर छापे टाकले. हे चिनी व्यक्तींच्या नियंत्रित झटपट अ‍ॅप-आधारित कर्ज देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करत होते. धक्कादायक म्हणजे हे लोक चीनमधील आपल्या मालकासाठी काम करत होते. भारतीयांची फसवणूक करून त्यांची माहिती चीनला विकत होते. तसेच याचा आर्थिक गैरव्यवहाराशी संबंध असल्याचंही चौकशीत समोर आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर ईडीने 2 सप्टेंबरलाही छापेमारी केली होती. 






पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु


काही पेमेंट गेटवे ऑपरेटर म्हणजे ऑनलाईन कर्ज देणाऱ्या कंपन्या या चिनी लोन अ‍ॅप प्रकरणामध्ये गुंतलेल्या कंपन्यांचा आणि सुमारे तीन राज्यांमधील ऑपरेटर्सचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. फेडरल एजन्सीने 2 सप्टेंबर रोजी पेटीएम, रेझरपे आणि कॅशफ्री सारख्या पेमेंट गेटवेच्या बेंगळुरू येथील कर्जदारांवर छापेमारी केली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, लोन अ‍ॅपद्वारे या कंपन्या लोकांच्या मोबाईलमध्ये मालवेअर सॉफ्टवेअर बसवायचे. त्याद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती मिळवली जाऊ शकतो. अ‍ॅपद्वारे दिलेल्या कर्जाच्या बदल्यात अनेक पट अधिक रुपये आकारले जातात. ज्यांना कर्जाची रक्कम परत करता आली नाही, किंवा कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्यास नकार दिला, त्यांचे फोटो मॉर्फ करून अश्लील बनवले जातात.


कोरोनाकाळात लोन ॲप्सच्या संख्येत वाढ 


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 8 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वोच्च मंत्रालय आणि RBI अधिकाऱ्यांच्या बैठकीत बेकायदेशीर लोन अ‍ॅप्सशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती आणि अशा अ‍ॅप्सच्या ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या काळात जगभरासह देशातही आर्थिक संकट निर्माण झालं होतं. या काळात लोकांना पैशाची चणचण होती. त्यामुळे नोंदणी नसणाऱ्या कर्ज देणाऱ्या ॲप्सच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं दिसून आलं. आर्थिक चणचणीमुळे अनेक लोक या ॲप्सच्या कर्जाच्या जाळ्यात अडकले. भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांना या अनोंदणीकृत लोन ॲप्सपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. RBIने कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या ग्राहकांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या