Pune Rain Update: पुणे शहरात (Pune) रात्रीपासून (Pune Rain) पुन्हा पावसाने जोर धरला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात देखील संततधार पाऊस पडत आहे. दोन दिवस पुणे जिल्ह्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. ऑरेन्ज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला होता. त्यामुळे कालपासून शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. 


चार धरणं हाऊसफुल्ल
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ होत आहे. येत्या 3 ते 4 तासांमध्ये खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे 22,000 ते 25,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यातील चारही धरणं भरल्याने यंदा पाण्याची चिंता मिटली आहे.


नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चारही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये आणि नदीपात्रात काही साहित्य आणि जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत. तसंच सर्व नागरिकांना योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 


पावसाने नागरिकांचं नुकसान
काही दिवसांपूर्वी झालेल्या चार तासांच्या पावसाने पुणेकरांची दैना केली होती. विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर चार तासांच्या पावसाने पुणे धुवून काढलं होतं. या पावसामुळे पुणेकरांचं मोठं नुकसान झालं. पुण्यात अनेक सखोल भाग आहेत. दरवर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. काल झालेल्या पावसाने देखील अनेक परिसरातील घरात पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आंबील ओढा, वानवडी या परिसरतील काही घरांमध्ये अति प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यासोबतच मोठ्या झाडपडीच्या घटना देखील समोर आल्या होत्या. शहरात किमान 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या होत्या.


राज्यभर मुसळधार  पावसाची हजेरी 
मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी  जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.