मुंबई: (Marathi News) मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर महायुतीत (BJP MNS Alliance) मनसेची सोबत पक्की मानली जात असून राज ठाकरेंनी अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. मात्र महायुतीतील प्रवेशाबाबत अजूनही कोणती भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांत राज ठाकरे आगामी निवडणुकीसाठी नेमकी कोणती भूमिका घेणार?, महायुतीत दाखल होणार का?, याची उत्तरं समोर येतील. मात्र अमित शाह यांच्या भेटीवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. 


संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र एक्सवर (आधीचे ट्विटर) शेअर करत टोला लगावला आहे. अप्रतिम...अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र!really great...चित्रकार...सुप्रसिद्ध...होऊ दे चर्चा, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. दरम्यान, संजय राऊतांनी शेअर केलेलं व्यंगचित्र राज ठाकरेंनी 2019मध्ये रेखाटलं होतं. या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. 






राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे केली होती बोचरी टीका


2019 साली रेखाटलेल्या व्यंगचित्राला 'स्वतंत्रते न बघवते', असे शीर्षक राज ठाकरे यांनी दिले होते. पंतप्रधान मोदी 'प्रजासत्ताक' फासावर लटकवत आहेत आणि मोदींचे हात बळकट करा, असे म्हणत अमित शाह त्यांच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले आहे. 


आज राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट


राज ठाकरे सोमवारी रात्री उशिरा दिल्लीसाठी रवाना झाले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईतल परतले आहेत. या भेटीवर मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती बाळा नांदगांवकर यांनी दिली आहे. तसेच मी याआधी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरेंनी सांगितलं तर मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. आम्हाला कानावर आदेश पडला की त्यानुसार कृती करण्याची सवय आहे, असंही बाळा नांदगांवकर यांनी सांगितले.