Dhule Crime News : लाचखोरी विरोधात धुळे एसीबीच्या (Dhule ACB)पथकाने आज कारवाई केली आहे. पशुपक्षी फार्मचे दुकान सुरु करण्यासाठी परवाना देण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख आणि दुसरा एक साथीदार तुषार जैन यांना पकडण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement


नेमकी कशी केली कारवाई? 


तक्रारदार यांनी शिरपूर येथील संकुलात भाडेतत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे होते. यासाठी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन, धुळे विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज केला होता. या अर्जासंदर्भात तक्रारदार व त्यांच्या आतेभावाने धुळे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली. तेव्हा देशमुख यांनी तक्रारदारांना शिरपूर येथील मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह 4 मार्च रोजी त्यांच्या दुकानावर येऊन स्थळपरीक्षण करणार असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदारांना तुषार जैन यांच्याकडे 8 हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा पुढील कार्यवाही करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी त्याच दिवशी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने 4 मार्च रोजी पडताळणी केली. त्यावेळी औषध निरीक्षक देशमुख यांनी खाजगी इसम तुषार जैन यांच्यासह शिरपूर येथे जाऊन तक्रारदारांच्या दुकानाचे स्थळपरीक्षण केले. त्यावेळी तुषार जैन यांनी तक्रारदारांकडे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली आणि देशमुख यांनी त्यास दुजोरा दिला. त्यानंतर आज दिनांक 11 मार्च रोजी धुळे शहरातील पारोळा चौफुली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदारांकडून तुषार जैन यांनी कारमधून येऊन 8 हजार रुपये स्वीकारले. यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनाही अन्न व औषध प्रशासन कार्यालय, धुळे येथून ताब्यात घेण्यात आले.


दरम्यान, या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7-अ व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी लाच घेण्याचे प्रकार वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभाग सतर्क झालं आहे.


महत्वाच्या बातम्या:


धुळ्यात शिक्षिकेकडून 2 लाखांची लाच घेताना बड्या महिला अधिकाऱ्याला अटक; शिक्षण क्षेत्रात खळबळ, नेमकं प्रकरण काय?