धाराशिव : सध्याची लहान पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे, मोबाईलवरील व्हिडिओ पाहून आणि गेमिंगचे व्हिडिओ पाहून तसंच वागते, अशी चर्चा सातत्याने ऐकायला मिळते. मात्र, अनेकदा तशा घटना घडल्याने हे सत्यवचन ठरल्याचंही पाहायला मिळालं आहे. यापूर्वी गेमिंगच्या नादात काही लहान मुलांनी स्वत:चा जीवही गमावल्याचं पाहायला मिळालं आहे. तर, गुन्हेगारी घटनांचं अनुकरण करण्याचं कामही त्यांच्याकडून झालं आहे. आता, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली असून अल्पवयीन असलेल्या तीन मुलींनी चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव करुन थेट कोरियाचा मार्ग धरला होता. घरातून 5 हजार रुपये घेऊन त्या तिन्ही मुली कोरियातील एका डान्स ग्रुपला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, कुटुंबीयांकडून मुलींचे अपहरण झाल्याची बातमी पोलिसांपर्यंत (Police) पोहोचताच पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटांत तपासाचा उलगडा केला. त्या तिन्ही पोरींना ताब्यात घेतलं. 


धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे 3 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता. विशेष म्हणजे घरातून 5 हजार रुपये चोरुन घेत दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन देखील त्यांनी बनविला. मात्र, पोलिसांच्या दक्षतेने हा बनाव उघड झाला असून त्या मुलींचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे. या तीन पैकी 2 मुली ह्या 11 वर्षाच्या आहेत, तर एक मुलगी 13 वर्षाची आहे. आमच्या नरड्याला चाकू लावुन आमचे अपहरण करण्यात आले आहे असे सांगून ह्या मुली पुण्याच्या दिशेना निघाल्या व त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅनही केला होता. 


कोरियना डान्स ग्रुपच्या फॅन


धाराशिवमधील ह्या तिन्ही मुली कोरियातील BTS-V ह्या कोरियन सिंगर व डान्स ग्रुपच्या फॅन होत्या, कोणत्याही स्तिथीत ह्या ग्रुपला भेटायचे, असे म्हणत त्या तिघींनी अपहरणाचा प्लॅन रचला व घरातून पळ काढला. पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपास केला व मुलींची सुखरुप सुटका करीत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. उमरगा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत अवघ्या 30 मिनिटाच्या आत 3 अल्पयीन मुलींचा अपहरणाचा बनाव उघडा करीत त्यांचा शोध घेतला. पोलिसांच्या या वेगवान तपासाबद्दल त्यांचं समाजातून व वरिष्ठांकडून कौतुक होत आहे. तर, मुलींच्या पालकांकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले आहेत. दरम्यान, सध्याच्या तरुणाईवर सोशल मिडिया व मोबाईलचे वेड असल्याचे अशा अनेक घटनांमधून उघड होत आहे. त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांकडे प्राधान्याने लक्ष देऊन ते सोशल मीडियावर काय पाहतात, ते काय विचार करतात, कोणासोबत असतात याचे आकलन करुन त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच, काही चुकीचे आढळून आल्यास त्यांचे प्रबोधनही करायला हवे.


हेही वाचा


पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला