Dharashiv Crime News : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका ऊसतोड कामगार महिलेवर पोलीस कर्मचाऱ्यांनेच बळजबरीने अत्याचार केला आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पोलिसावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आष्टावाडी शिवारात 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी दगडू सुदान भुरके व खासगी जीप चालक सागर चंद्रकांत माने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, ऊसतोड कामगार महिला आणि तिचा दीर भूम बसस्थानकात दुपारच्या सुमारास थांबले होते. त्यांना बार्शीकडे जायचे असल्याने ते बसची वाट पाहत होते. दरम्यान, याचवेळी भूम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला दगडू सुदान भुरके तिथे आला. तसेच पिडीत महिलेकडून जाऊन 'कोठून आलात? इथं कशासाठी थांबलात? तुम्ही चोर दिसतायं? असे म्हणू लागला. यावेळी त्याने फोन करून खासगी चालक सागर माने यास जीप घेऊन बोलावून घेतले. बस स्थानकात उभे असलेल्या महिला आणि तिच्या दिराला पोलीस ठाण्यात घेऊन जायचं असल्याचे सांगून गाडीत बसवून बसस्थानकाच्या बाहेर बाजारात नेले. त्यानंतर दोघांनाही सोडून देण्यासाठी 10 हजारांची मागणी केली. यावेळी पीडितेने ऊसतोड मुकादम यांना फोन करून सागर मानेच्या मोबाईलवर पैसे पाठवले. पैसे मिळाल्यावर पीडिता व तिच्या दिराला तिथेच सोडून कॉनस्टेबल भुरके तेथून निघून गेला, आणि पुन्हा परत आला.
ज्वारीच्या पिकात नेऊन बळजबरीने अत्याचार
कॉनस्टेबल भुरके याने सोडल्यावर महिला आणि तिचा दीर पुन्हा वस स्थानकावर येऊन उभे राहिले. मात्र, कॉन्स्टेबल भुरके दुचाकीवरून पुन्हा तिथे आला आणि 'तुम्ही इथं थांबू नका. तुम्हाला दुसरे पोलिस घेऊन जातील. मी तुम्हाला आष्टावाडी येथे सोडतो', असे म्हणाला. त्यानंतर दोघांना दुचाकीवर बसवून आष्टावाडीला पोहचला. तिथे गाडी थांबवून एक फोन केला आणि फोन ठेवल्यानंतर 'मॅडमला तुम्हाला भेटायचे असल्याचे सांगितले. तसेच, माझ्यासोबत पोलिस स्टेशनला चला', असे म्हणून दिराला तिथेच सोडून पीडितेस दुचाकीवर बसवून तेथून निघून गेला. दुचाकी काही अंतरावर गेली असता, कॉन्स्टेबलने भुरके याने पीडित ऊसतोड कामगार महिलेस ज्वारीच्या पिकात नेऊन बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेस पुन्हा आष्टावाडी येथे सोडून फरार झाला. त्यामुळे महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल दगडू सुदान भुरके व खासगी जीप चालक सागर चंद्रकांत माने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :